एलईडी बल्बचे गोदाम खाक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने वाचवली. ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सहा तास लागले.

औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने वाचवली. ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सहा तास लागले.

शहरातील सर्वच वॉर्डांमध्ये पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर एलईडी बल्ब मागविण्यात आले आहेत. दिल्लीतील इलेक्‍ट्रॉन एनर्जी कंपनीला वॉर्डातील पथदिव्यांचे बल्ब बदलून एलईडी लावण्याचे काम देण्यात आले आहे. त्यासाठी कंपनीने चिकलठाणा एमआयडीसीतील ब्रिजवाडी भागात तीन मजली गोदाम किरायाने घेतले आहे. एक वर्षापासून हे गोदाम कंपनीच्या ताब्यात आहे. रविवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास गोदामाला अचानक आग लागली. यावेळी शेजारील दोन कंपन्यांमध्ये वॉचमन होते. आग भडकल्याचे पाहून ब्रिजवाडीतील तरुणांनी गोदामाच्या दिशेने धाव घेतली. या आगीचे लोळ पाहून गस्तीवर असलेले सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शेख अकमल, उपनिरीक्षक सुरेश जारवाल व वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. आगीची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला दिली. यानंतर गरवारे कंपनी, एमआयडीसी सिडको आणि महापालिकेचे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्‍यात येत नसल्याचे पाहून पाण्याचे टॅंकर मागविण्यात आले. सायंकाळी साडेसहापर्यंत सुमारे ३० ते ३५ टॅंकर मागविण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच कंपनीचे व्यवस्थापक परमेश्वर बनसोडे, सय्यद शहा अब्दुल हक व अभय गुळवे यांनी धाव घेतली. सहा तासांच्या अथक परिश्रमांनी ही आग आटोक्‍यात आली.

तरुणांनी वाचवली वाहने 
गोदामाच्या आवारात आग लागली तेव्हा दोन छोटा हत्ती वाहने होती. परिसरातील तरुण रणजित मोरे, सतीश शिनगारे, मिलिंद पाखरे, सुमित शिंदे, बाळू साळवे यांनी छोटा वाहने वाचविण्यासाठी हाताने काचा फोडून हॅंड ब्रेक दाबत ती बाहेर काढली. यामुळे पुढील हानी टळली. 

आगीचा प्रश्‍न गंभीर 
औद्योगिक वसाहतीत आगीचा भडका वारंवार उडत आहे. या महिनाभरातील ही चौथी घटना आहे. यापूर्वी वाळूज एमआयडीसीमध्ये चार कंपन्यांना आग लागली होती. यात एक कंपनी भस्मसात झाली होती. शेंद्रा तसेच चिकलठाणा येथील औद्योगिक वसाहतीतही आगीच्या घटना घडल्या. त्यानंतर आता ब्रिजवाडीत एलईडीच्या गोदामालाही आग लागली. औद्योगिक भागातील आगीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 

स्थलांतर होण्यापूर्वी आग 
या गोदामाच्या खालच्या मजल्यात जुने बल्ब, ट्यूब, केबल वायर ठेवण्यात आले होते; तर नवीन एलईडी बल्ब वरच्या मजल्यावर होते. तसेच आवारात केबलचे सात ते आठ ड्रम ठेवण्यात आले होते. नवीन एलईडी बल्ब पुठ्ठ्यात आणि थर्माकोलमध्ये पॅकिंग केलेले होते. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. या गोदामात नवीन व जुने बल्ब ठेवण्यासाठी जागा पुरेशी नव्हती. त्यामुळे नव्याने गोदाम शोधण्यात आले होते. तेथे काही दिवसांतच सारे साहित्य हलवण्यात येणार होते; मात्र त्यापूर्वीच आग लागून सर्व साहित्यासह गोदाम भस्मसात झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LED bulb warehouse fire