शहराची ‘अंधेरनगरी’!

LED-Lamp
LED-Lamp

औरंगाबाद - पाणी, कुत्रे, कचऱ्याची समस्या सोडविता-सोडविता महापालिका प्रशासन-पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. त्यात आता पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्‍नही गंभीर होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेने पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम एलईडीच्या कंत्राटदाराकडे सोपविले होते; मात्र ठेकेदाराने नकार कळविला आहे. सध्या हजारो पथदिवे बंद असून, नव्याने कंत्राटदारांची नियुक्ती होईपर्यंत शहराची ‘अंधेरनगरी’ होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

महापालिकेने शहरातील ४० हजार जुने पथदिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे लावण्याचे १२० कोटी रुपयांचे कंत्राट इलेक्‍ट्रॉन लायटिंग सिस्टीम या कंपनीला दिले आहे. आठ वर्षे देखभालीचे कामही या कंपनीला करावे लागणार आहे. ४० हजार एलईडी दिवे आणि १० हजार नवीन विद्युत पोल लावण्याच्या कामाची मुदत ३१ मार्चला संपत आहे. ठेकेदाराने आतापर्यंत २३ हजार दिवे लावले आहेत. दरम्यान, इतर पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाचा करार संपल्यामुळे ठेकेदारांचे ३१ डिसेंबर २०१८ पासून काम थांबविण्यात आले व हे काम एलईडीच्या ठेकेदाराला देण्यात आले; मात्र हे काम करण्यास ठेकेदाराने नकार दर्शवला आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून शहरातील दिव्यांची दुरुस्ती थांबली आहे. आता दिव्यांच्या दुरुस्तीसाठी प्रभागनिहाय २४ ते २५ लाख रुपयांची अंदाजपत्रके तयार करून या कामाच्या निविदा काढल्या जाणार असल्याचे उपअभियंता खमर यांनी सांगितले.

नोटीस बजाविण्याचे आदेश
एलईडीच्या ठेकेदाराने कामाचा कालावधी संपत आला तरी म्हणावे तसे काम केलेले नाही. दुसरीकडे इतर पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यास नकार दिली आहे. दरम्यान, एलईडी दिव्यांमुळे विजेची बचत देखील होत नसल्याने महापौर घोडेले यांनी कंत्राटदारास नोटीस बजाविण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com