एलईडी पथदिव्यांनी लातूर उजळणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

लातूर - महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व पथदिव्यांवर एलईडी दिवे बसविण्यात येणार अन्‌, त्यासाठी भागीदारी तत्त्वावर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जात आहे. यातून पालिकेचा सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च टाळणे शक्‍य होणार आहे. त्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यास शहरातील सुमारे १८ हजार पथदिवे बदलून शहर उजळून निघेल, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.

शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती विद्युत विभागामार्फत केली जाते. विद्युत विभागामध्ये ३० कर्मचारी आहेत. सध्या पालिकेच्या चार झोन कार्यालयांतून पथदिव्यांची देखभाल केली जाते. यामध्ये तांत्रिक माहितगार कर्मचारी कमी असल्याने व अपुऱ्या संख्येमुळे सद्यःस्थितीत जवळपास १४ हजार ४३१ पथदिव्यांची विद्युत साहित्य खरेदी करून ठेकेदारांमार्फत काम करून घेण्यात येते. सध्या अस्तित्वात असणारे पथदिवे पारंपरिक पद्धतीचे (ट्यूब, मर्क्‍युरी, सोडिअम, सीएफएल) आहेत. हे पथदिवे जुने असल्याने व वारंवार देखभाल दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करूनही पथदिवे सतत बंद राहत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शहरातील जवळपास तीन हजार ९०० खांबांवरील पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने त्या ठिकाणी पथदिवे बसविण्याची मागणी वारंवार होत आहे. साहित्य खरेदी, देखभाल दुरुस्ती याशिवाय मासिक वीजबिलांवर होणारा खर्च मोठा आहे. हा खर्च टाळता येत नसला तरी त्यात बचत करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार केंद्र व शासनाकडून अत्याधुनिक पद्धतीचे वीज बचतीचे एलईडी पथदिवे बसविण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. याद्वारे साधारणपणे ६० टक्के वीज बचत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व पथदिव्यांवर एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. काही संस्थांनी आर्थिक भागीदारी पद्धतीने एलईडी पथदिवे बसविण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर सरळ खरेदी मार्गाने पालिकेस सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन शहरातील सुमारे १८ हजार पथदिवे बदलण्यात येणार आहेत.

Web Title: LED street Latur lightning