बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

गंगापूर, (जि. औरंगाबाद)  : सिद्धपूर (ता. गंगापूर) येथे बिबट्याने दहशत निर्माण केली असून, गुरुवारी (ता. पाच) पहाटे विष्णू देवकर यांच्या गोठ्यातील एका गायीचा बिबट्याने फडशा पाडला आहे.

गंगापूर, (जि. औरंगाबाद)  : सिद्धपूर (ता. गंगापूर) येथे बिबट्याने दहशत निर्माण केली असून, गुरुवारी (ता. पाच) पहाटे विष्णू देवकर यांच्या गोठ्यातील एका गायीचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली असून, ग्रामस्थांसह शेतशिवारात खरीप हंगामाच्या कामांत व्यस्त असलेले शेतकरी भयभीत झाले आहेत. 

याविषयी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके धामोरीकर यांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची, तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. शिवारातील बगडी, ममदापूर, कानडगाव परिसरात बिबट्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, गोदावरीचा संपूर्ण काठच गेल्या काही वर्षांपासून बिबट्याच्या दहशतीखाली आहे.
 

अनेकवेळा वन विभागाला कळवूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याच परिसरात गतवर्षी बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. तालुक्‍यात आता ऊसतोडणीचे काम सुरू होणार आहे. त्यात पुन्हा बिबट्या अवतरल्याने ऊसतोड मजूरही काम करण्यास धजावत नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard attacks cow