गायींच्या हल्ल्यातील बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

औरंगाबाद - गौताळा अभयारण्यालगत भांबरवाडी (ता. कन्नड) शिवारात गायींच्या प्रतिहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा जुन्नरच्या निवारा केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गायींनी शिंगावर घेतल्याने किंवा तुडवल्याने त्याच्या मणक्‍याचे हाड मोडल्याचा कयास वन विभागाने वर्तवला होता.

गौताळा अभयारण्याला लागून असलेल्या उपळा गटातील भांबरवाडी शिवारात सोमवारी (ता. 9) पहाटे चारच्या सुमारास या बिबट्याने प्रवेश करून गावातील एका गोठ्यात शिरून त्याने जनावरांवर हल्ला केला. यात दोन गायी जखमी झाल्या. वासराचा फडशा पाडला. संतापलेल्या गायींनी प्रतिहल्ला चढवून त्याला जबर जखमी केले. तशाच अवस्थेत बिबट्याने जंगलात धूम ठोकली.

नाल्यात लपलेल्या जखमी अवस्थेतील बिबट्याला वन विभागाने बाहेर काढले. अधिक उपचारांसाठी जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठवण्यात आले होते. पण उपचारादरम्यान मंगळवारी (ता. 10) त्याने प्राण सोडले. विभागीय वन्यजीव अधिकारी रावसाहेब काळे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

Web Title: leopard death by cow attack