गायींनी कंबरडे मोडलेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू

संकेत कुलकर्णी
गुरुवार, 12 जुलै 2018

औरंगाबाद : गौताळा अभयारण्यालगत भांबरवाडी (ता. कन्नड) शिवारात गायींच्या प्रतिहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा जुन्नरच्या निवारा केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गायींनी शिंगावर घेतल्याने किंवा तुडवल्याने त्याच्या मणक्याचे हाड मोडल्याचा कयास वन विभागाने वर्तवला होता.

औरंगाबाद : गौताळा अभयारण्यालगत भांबरवाडी (ता. कन्नड) शिवारात गायींच्या प्रतिहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा जुन्नरच्या निवारा केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गायींनी शिंगावर घेतल्याने किंवा तुडवल्याने त्याच्या मणक्याचे हाड मोडल्याचा कयास वन विभागाने वर्तवला होता.

गौताळा अभयारण्याला लागून असलेल्या उपळा गटातील भांबरवाडी शिवारात सोमवारी (ता.9) पहाटे चारच्या सुमारास या बिबट्याने प्रवेश केला होता. गावातील एका गोठ्यात शिरून त्याने जनावरांवर हल्ला केला. यात दोन गायी जखमी झाल्या. वासराचा फडशा पाडला. पण संतापलेल्या गायींनी प्रतिहल्ला चढवून त्याला जबर जखमी केले. तशाच अवस्थेत बिबट्याने जंगलात धूम ठोकली. वन विभागाने जंगलात पाहणी केल्यानंतर एका नाल्यात खोलवर जखमी अवस्थेत बसलेला बिबट्या त्यांच्या निदर्शनास आला. त्याला मोठ्या हिकमतीने घेरून फास टाकून वर काढण्यात आले. इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करून औरंगाबाद येथे आणण्यात आले. कन्नडच्या पशुवैद्यकीय केंद्रात आणि नंतर सिद्धार्थ उद्यानात तात्पुरती तपासणी केली, मात्र मणक्याच्या हाडांना गंभीर दुखापत असल्यामुळे मागील पायांवर उभाही राहू न शकणाऱ्या त्या बिबट्याला अधिक उपचारांसाठी जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठवण्यात आले होते.

वयस्कर बिबट्याला उपासमार झाल्याने आलेला अशक्तपणा, अंगावर गोचिडांचा प्रादुर्भाव आणि त्यातच गायींच्या प्रतिहल्ल्यात मोडलेला कणा यामुळे त्याला उभे राहणेही अशक्य झाले. तात्पुरत्या औषधोपचारांवर औरंगाबाद ते जुन्नर हा खडतर प्रवास त्याने केला खरा. पण जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. दहा) त्याने प्राण सोडले. विभागीय वन्यजीव अधिकारी रावसाहेब काळे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard died in cow s attack while treatment