अंबडजवळ बिबट्याला विष घातल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

जालना - दह्याळा (ता. अंबड) येथील शिवारात गुरुवारी (ता. २९) बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास निदर्शनास आली; मात्र वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचायला रात्रीचे आठ वाजले. 

जालना - दह्याळा (ता. अंबड) येथील शिवारात गुरुवारी (ता. २९) बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास निदर्शनास आली; मात्र वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचायला रात्रीचे आठ वाजले. 

दह्याळा येथील शेतकरी विकास गारुळे यांच्या उसाच्या शेतात त्यांना हा बिबट्या आढळून आला. शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला कळविल्यानंतर रात्री आठ वाजता वन विभागासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. बिबट्याच्या शरीरातून विषारी औषधाचा वास येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत पशुसंवर्धन आणि वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सकाळी उत्तरीय तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

दहा दिवसांतील दुसरी घटना
खुलताबादच्या (जि. औरंगाबाद) पळसवाडी वन परिक्षेत्रातील पिंपरी शिवारात १९ नोव्हेंबरला मादी बिबट मृतावस्थेत आढळले होते. त्याचा फॉरेन्सिकचा अहवाल अद्याप आलेला नाही. दहाच दिवसांत ही दुसरी घटना समोर आल्याने उसाच्या शेतात आसरा घेणाऱ्या बिबट्यांना संपवण्यासाठी विष चारण्याचा गुन्हा शेतकऱ्यांकडून केला जात नाही ना, असा संशय व्यक्त होत आहे.

बिबट्या वस्तीत येतोच कसा?
वन्य प्राण्यांसाठी जंगलात पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नसल्याने हे प्राणी शेतात, वस्तीत येतात. उसाच्या फडात पाणथळ जागेत बिबट्याची मादी पिले घालते. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकरी भीतीपोटी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या खटपटीत असतात, असे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. पशुवैद्यक केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा अहवाल, नंतर फॉरेन्सिक रिपोर्ट, असा सगळा महिनाभराचा उटारेटा केल्यानंतर ते प्रकरण शांत केले जात असल्यामुळे बिबट्याच्या शत्रूंचे फावत असल्याचा आरोप प्राणिप्रेमींनी केला आहे.

Web Title: Leopard Poison