प्लॅस्टिक बंदी : औरंगाबादमध्ये वर्षभरात 31 लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

प्लॅस्टिक बंदी आदेशाची अंमलबजावणी करीत महापालिकेने गेल्या वर्षभरात तीन हजार 400 दुकानदारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 31 लाख 82 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 हजार 153 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. 

औरंगाबाद - प्लॅस्टिक बंदी आदेशाची अंमलबजावणी करीत महापालिकेने गेल्या वर्षभरात तीन हजार 400 दुकानदारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 31 लाख 82 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 हजार 153 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. 

प्लॅस्टिकचा पर्यावरणावर परिणाम होत असल्याचे कारण देत राज्य सरकारने 22 जून 2018 ला प्लॅस्टिक बंदी लागू केली होती. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील महापालिकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने प्लॅस्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी एक जुलै 2018 पासून सुरू केली. त्यासाठी वॉर्डस्तरावर प्रत्येक एक तर मुख्यालयात एक असे दहा पथके तयार करण्यात आले होते. या पथकांसह नागरिक मित्र पथकानेदेखील कारवाया केल्या. शहरातील विविध भागातील 24 हजार 125 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यातील 3,400 दुकानदारांवर दंडात्मक व जप्तीची कार्यवाही करून त्यांच्याकडून 31 लाख 82 हजार 74 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या दुकानदारांकडून 12 हजार 153 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. 
 
कचरा फेकणाऱ्या चार हजार जणांवर कारवाई 
कचराकोंडीनंतर महापालिकेने रस्त्यावर कचरा फेकण्यास मनाई केली आहे. वारंवार आवाहन केल्यानंतरही नागरिक, दुकानदार, आस्थापनांकडून रस्त्यावर, मोकळया मैदानावर, उघड्यावर कचरा फेकत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नागरिक मित्र पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकात असलेल्या माजी सैनिकांनी चार हजार 272 नागरिक, दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 35 लाख 50 हजार 960 रुपये इतका दंड वसूल केला असल्याचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: letest News about Amc