चित्रा वाघ यांची हकालपट्टी होणारच होती : फौजिया खान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील महिला पदाधिकारी नाराज होत्या. गेल्या सात महिन्यांपासून त्यांच्याविरुद्ध तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी होणार होती, त्याला थोडा उशीर झाला. तोपर्यंत वाघ यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याचा खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांनी केला. 

परभणी - राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील महिला पदाधिकारी नाराज होत्या. गेल्या सात महिन्यांपासून त्यांच्याविरुद्ध तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी होणार होती, त्याला थोडा उशीर झाला. तोपर्यंत वाघ यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याचा खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांनी केला. 

श्रीमती वाघ यांच्या जागी रूपाली चाकणकर यांच्या निवडीची माहिती देण्यासाठी डॉ. खान यांनी येथे आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी तहसीन खान उपस्थित होते. डॉ. खान म्हणाल्या, बहुतांश जिल्ह्यांतील महिला पदाधिकारी श्रीमती वाघ यांच्यावर नाराज होत्या. नवीन अध्यक्षा द्या, अशा मागण्या महिलांकडून होत होत्या. महिला पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे संबंध बिघडत चालले होते. हे पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आले होते. त्यामुळे बदल होणारच होता.

हे समजल्यावर वाघ यांनी स्वतःहून राजीनामा दिला. त्यांचे संघटनही शक्तिशाली नव्हते. त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ लागले होते. त्या पदावरून दूर झाल्यानंतर राज्यातून महिला पदाधिकाऱ्यांचे फोन आले. "आम्ही तुमच्यासोबत आहोत, त्या गेल्या तर जाऊ द्या,' असे महिलांनी सांगितले. श्रीमती वाघ अन्य पक्षात जाणार असून त्याला काही वैयक्तिक कारणेही आहेत. आपल्या व्यक्तिगत समस्या सत्ताधाऱ्यांकडे गेल्यावर मिटतील, असे त्यांना वाटत असावे. "आयाराम - गयाराम'चे वारे तर प्रत्येक पक्षात वाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सत्ताधाऱ्यांकडून भीती अन्‌ आमिष 
विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधाऱ्यांकडून भीती, आमिषाचा वापर केला जात आहे. सरकारी संस्थांचा वापर करून दबाव आणला जात आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्याबाबतही तेच झाले. हे तंत्र लोकशाहीला धरून नाही, असे डॉ. खान म्हणाल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: letest news about Chitra wagh