अबब... मृतही झाले जिवंत!

Janashri Insurance Scheme
Janashri Insurance Scheme

औरंगाबाद - केंद्राच्या जनश्री विमा योजनेचा गैरफायदा घेत संधीसाधू सामाजिक संस्थांनी जीवन विमा पॉलिसीला ९९ लाख ३० हजारांचा गंडा घातला. हा गंभीर प्रकार २०१४ ते २०१८ या काळात घडला. खासकरून सामाजिक संस्थांनी बनावट कागदपत्रांद्वारे मृताच्या नावे रक्कम उचलून त्याच व्यक्तीला पुन्हा जिवंत दाखवून त्यांची पॉलिसी काढल्याचा प्रकारही उजेडात आला आहे. याप्रकरणी शहरातील आठ संस्थांतील दहा जणांविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात एक मे रोजी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.   

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, भीमराव संपतराव सरवदे (वय ६०, रा. नंदनवन कॉलनी) हे भारतीय आयुर्विमा महामंडळ (जीवन विमा पॉलिसी), जीवन प्रकाश बिल्डिंगमध्ये निवृत्ती वेतन व समूह विमा विभागात वरिष्ठ शाखा अधिकारी आहेत. सन २००० मध्ये जनश्री विमा योजना राबविण्यात आली. 

या योजनेअंतर्गत असंघटित लोकांच्या समूहासाठी जीवन विमा पॉलिसी देण्यात येते. यात समूहातील प्रत्येक सदस्याचा तीस हजारांचा विमा उतरवण्यात येतो. योजनेअंतर्गत असंघटित लोकांची नोंदणी सामाजिक संस्थेमार्फत केली जाते. नोंदणीकृत सदस्यांच्या विम्याच्या अर्धा विमा हप्ता केंद्र शासन व उर्वरित अर्धी रक्कम संस्था भरते. प्रत्येक नोंदणीकृत समूहासाठी एक मास्टर पॉलिसी काढली जाते. नियमाप्रमाणे दरवर्षी पॉलिसीचे नूतनीकरण केले जाते. नूतनीकरण करताना गतवर्षी समूहातील मृत सदस्यांना वगळले जाते. या योजनेप्रमाणे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या समूह विमा योजनेअंतर्गतही समूह विमा देण्यात येतो.

याअंतर्गत कमीत कमी २५ जणांच्या समूहासाठी विमा पॉलिसी दिली जाते. समूह विमा योजनेचा पूर्ण हप्ता संस्थेमार्फत भरला जातो. दरवर्षी नियमाप्रमाणे महामंडळाच्या वतीने वर्षाअखेरीस वरिष्ठ कार्यालयामार्फत निरीक्षण होते. त्यांच्या अहवालानुसार विभागीय कार्यालयाने प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. समितीने प्रकरणांचा अहवाल सहा मार्च २०१९ ला वरिष्ठ कार्यालयाला दिला. त्यानंतर पाच व अठरा एप्रिलदरम्यान प्रकरणाची अधिक चौकशी केली गेली. त्याचा अहवाल कागदपत्रांसह सादर झाला. 

काय आहे अहवालात?
- तपास अहवालात विभागातर्फे आलेल्या मृत्यू दाव्याच्या कागदपत्रांत काही संस्थांनी बनावट व खोटे मृत्यू प्रमाणपत्र सादर करून चुकीचे दावे दाखल केले. 
- त्याद्वारे त्यांनी रक्कमही उचलली. काही प्रकरणांत ज्या सदस्यांचा मृत्यू दावा एका योजनेअंतर्गत घेतला गेला, ती व्यक्ती पुन्हा दुसऱ्या योजनेत जिवंत दाखविली गेली.
- त्याच व्यक्तीच्या नावावर आणखी एक मृत्यू दावा केल्याची बाब समोर आली. 
- परंतु या दाव्यातील काही व्यक्ती हयातही आहेत, असे चौकशीनंतर समोर आले. 
- संस्थेमार्फत दाखल मृत्यू प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे खोटी असल्याचे आढळले. 
- तपासणीत संस्थांनी तीन ते चार वर्षांत मृत्यूचे खोटे दावे दाखल केल्याची बाब समोर आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com