परवान्याच्या नूतनीकरणाचा जबर दंड झाला कमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

राज्यातील तब्बल २५ लाख वाहनधारकांना दिलासा
औरंगाबाद - वर्षानुवर्षे वाहन परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या प्रवासी व मालवाहतूक वाहनधारकांना महिना पाच हजारांचा दंड आकारण्याचा वर्षभरापूर्वी घेतलेला निर्णय परिवहन खात्याने मागे घेतला आहे. त्यामुळे राज्यातील पंचवीस लाख वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील तब्बल २५ लाख वाहनधारकांना दिलासा
औरंगाबाद - वर्षानुवर्षे वाहन परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या प्रवासी व मालवाहतूक वाहनधारकांना महिना पाच हजारांचा दंड आकारण्याचा वर्षभरापूर्वी घेतलेला निर्णय परिवहन खात्याने मागे घेतला आहे. त्यामुळे राज्यातील पंचवीस लाख वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या परवान्याचे दर पाच वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्‍यक असते. परंतु परवान्याचे नियमित नूतनीकरण करून घेणाऱ्यांचे प्रमाण नगण्य म्हणजे एकूण वाहनांच्या दहा टक्के एवढे होते. वारंवार सूचना व दंडाच्या रकमेत वाढ करूनही वाहनधारक परवान्याचे नूतनीकरण करण्याचे प्रमाण वाढत नव्हते. परवान्याच्या नूतनीकरणाच्या दोनशे रुपये शासकीय शुल्कातदेखील एक हजारापर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतरही वाहनाच्या परवान्याचे नूतनीकरण करणाऱ्यांची संख्या वाढत नसल्याने परवान्याची मुदत संपल्यानंतर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये असा जबर दंड आकारण्याचा कठोर निर्णय परिवहन विभागाने घेतला होता. परिवहन विभागासह संपूर्ण राज्यात हा आदेश लागू करून उशिरा परवान्याचे नूतनीकरण करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांकडून या वाढीव दंडाची वसुली सुरू केली होती. या निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीत वाढीव महसूल गोळा होत असला तरी या निर्णयाच्या विरोधात वाहनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. वाहन परवान्याचे नियमित शासकीय शुल्क एक हजार रुपये असताना केवळ उशीर झाला म्हणून पाचपट दंड आकारण्याच्या निर्णय मागे घ्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य वाहनचालक-मालक प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष अनिल थोरात, दीपक संभेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून वाढीव दंडाची रक्कम घटवून तो परवाना नूतनीकरणास होणाऱ्या महिन्यांच्या तुलनेत घेण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला.

अशी असेल वसुली
वाहन परवाना नूतनीकरणाची पाच वर्षांची मुदत संपल्याच्या तारखेपासून पहिल्या दोन महिन्यांसाठी दोनशे रुपये, दोन ते चार महिन्यांपर्यंत पाचशे रुपये, चार ते सहा महिन्यांसाठी एक हजार तर सहा ते महिन्यात नूतनीकरण केल्यास चार हजार तर दहाव्या महिन्यापासून पुढे नूतनीकरण केल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मुदतीत परमिट नूतनीकरण केल्यास कुठलाच दंड वाहनधारकांना लागणार नसला तरी जो उशीर करेल त्याला त्याने केलेल्या उशिराच्या पटीत दंड आकारला जाणार आहे.

Web Title: License renewal exorbitant fine was reduced