रेशमांच्या धाग्यांनी विणले शेतकऱ्यांचे जीवन

सयाजी शेळके
रविवार, 1 डिसेंबर 2019

जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळातही तुतीच्या बागा जगविल्या असून, नवीन लागवड करण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. एकरी लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.

उस्मानाबाद : रेशमाच्या धाग्याने शेतकऱ्यांच्या जीवनाचा धागा अधिकच बळकट केला आहे. दुष्काळातही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशमाच्या धाग्याने तारले असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळातही तुतीच्या बागा जगविल्या असून, नवीन लागवड करण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. एकरी लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. 

तुतीच्या लागवडीने तारले 
दुष्काळीस्थितीमुळे शेकतरी आर्थिक कचाट्यात सापडल्याने अनेकांची भांडवली गुंतवणूक दुष्काळाने हिरावून घेतली. काही शेतकऱ्यांनी जनावरे विकली तर काहींनी शेतीच विकली; मात्र तुतीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना तुतीच्या लागवडीने चांगलेच तारले आहे. कमी पाणी, चांगले उत्पन्न आणि योग्य भाव यामुळे सध्या रेशीम शेती चांगलीच बळकट होत चालली आहे. जिल्ह्यात 111 गावांतील एक हजार 681 शेतकऱ्यांकडे तुतीची शेती असून, सुमारे एक हजार 781 एकरांवर शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. 

आणखी वाचा - 'आम्ही फोडा फोडी केली तर भाजप रिकामी होईल!'

जिल्ह्यातील स्थिती 
जिल्ह्यात आतापर्यंत भूम तालुक्‍यात 164 शेतकऱ्यांनी रेशीम शेती केली असून, त्यांना अनुदान स्वरूपात एक कोटी 37 लाख 65 हजार रुपये मिळाले आहेत. तर कळंब तालुक्‍यात सर्वाधिक शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. यामध्ये 787 शेतकऱ्यांचा समावेश असून, आतापर्यंत त्यांना सहा कोटी 14 लाख पाच हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यानंतर उस्मानाबाद तालुक्‍यात 116 शेतकऱ्यांना 58 लाख 78 हजार रुपये, परंडा 51 शेतकऱ्यांना 13 लाख 39 हजार, तुळजापूर 51 शेतकऱ्यांना 23 लाख 39 हजार, वाशी 265 शेतकऱ्यांना दोन कोटी 64 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. रेशीम शेतीचे यश पाहून अनेक शेतकरी याकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील भूम तालुक्‍यात 37, कळंब 138, उस्मानाबाद 46, परंडा चार, तुळजापूर 55 तर वाशी तालुक्‍यातील 30 शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली आहे. 

आणखी वाचा - चंद्रकांत पाटील यांचं महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज'

रेशीम शेतीच्या पूरक बाबी 
जागतिक दर्जाची बाजारपेठ असलेल्या कर्नाटकातही जिल्ह्यातील रेशमांच्या कोषांना मागणी आहे. शिवाय दरही चांगला मिळतो. त्यातच आता जालना येथेही रेशीम कोषाची बाजारपेठ तयार झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The life of the farmers weaved with silk thread