लैंगिक अत्याचाराप्रकरणी जन्मठेप, एक लाख रूपये दंड

तानाजी जाधवर
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकऱणी एकाला जन्मठेप व एक लाख रुपये दंड, अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. ए. ए. आर औटी यांनी गुरुवारी (ता. 2) सुनावली. विशेष म्हणजे दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत हा निकाल लावण्यात आला आहे. 

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकऱणी एकाला जन्मठेप व एक लाख रुपये दंड, अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. ए. ए. आर औटी यांनी गुरुवारी (ता. 2) सुनावली. विशेष म्हणजे दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत हा निकाल लावण्यात आला आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, 23 व 24 मार्चच्या मध्यरात्री पिडीतेच्या घरात राम श्रीमंत पिस्के हा ती झोपलेली असताना आला व तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर पिडीतेस अंगावरील कपडे धुण्यास सांगुन पुरावा नष्ट करण्यास सांगितले. ही घटना कोणाला सांगितली तर ठार मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पिडीत मुलीने दिली होती. तुळजापूर पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सिमाली कोळी यांनी करुन तपासाअंती आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दोन महिन्यांच्या आत दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांच्या न्यायालयासमोर पंधरा दिवसांच्या आत पूर्ण झाली.

या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकुण आठ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकऱणातील पिडिती, पिडीतेची आई, बहीण, मैत्रीण व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. या प्रकरणात आलेला ठोस पुरावा तसेच पिडीतेचा वैद्यकीय तपासणी अहवाल व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यानी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी राम श्रीमंत पिस्के याला बालकाचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियमच्या कलमानुसार दोषी धरले.  यानुसार जन्मठेप व एक लाख रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची रक्कम न्यायालयात जमा केल्यास ही रक्कम पिडीतेस देण्याचे आदेश दिले आहे. आरोपीचे हे कृत्य म्हणजे रक्षकच ठरला भक्षक असे आहे, शिवाय पिडीतेच्या आयुष्यातील कधीही न पुसणारा डाग व काळीमा असल्याचे मत या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने नोंदवले.

Web Title: Life imprisonment and one lakh rupees penalty for Sexual Abuse