बालकाचा खून करणाऱ्यास जन्मठेप ; नांदेड न्यायालयाचा निकाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

तसेच खोलीत सैलानी बाबाचा फोटो, लिंबू, हळद आदी संशयास्पद वस्तुही आढळल्या. त्या जप्त करुन अर्धापूरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विठ्ठल अंगुले यांनी सुभाषविरुध्द भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करुन नांदेडच्या जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

नांदेड : किरकोळ कारणावरुन एका बालकाचा गळफास देऊन खून करणाऱ्या आरोपीला येथील प्रथम जिल्हा न्यायाधीश ए. जी. मोहाबे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

औंढा तालुक्यातील रांजळा येथील राहुल ग्यानोजी श्रीखंडे यांचा विवाह मालेगाव (ता. अर्धापूर) येथील अटकोरे कुटुंबातील दिक्षासोबत झाला होता. त्यांना दोन मुली व एक मुलगाही झाला. त्यानंतर एक मार्च २००९ रोजी राहुल श्रीखंडे हे पत्नी दीक्षा व मुलांसोबत मालेगावला आले होते. हे सर्व जण घरी जाताना वाटेत गावातील सुभाष नारायण वाघमारे हा तरुण भेटला. त्यानंतर हे कुटुंब राहुलची सासरवाडी अटकोरे यांच्या घरी गेले. 

जेवण करुन रात्री राहुल, पत्नी व दोन मुली घरात झोपले तर राहुलची सासू, मेहुणा व दीड वर्षाचा बालक ग्यानीरत्न हे अंगणात झोपले. दोन मार्च रोजी पहाटे चार वाजता ग्यानीरत्नची आजी लघुशंकेसाठी उठली असता तिला ग्यानीरत्न गायब झालेला दिसला. लगेच शोधाशोध केली. परंतु तो सापडला नाही. अर्धापूर ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आणि राहुल व त्याचा मेहुणा राजाभाऊ अटकोरे यांनी पोलिसांना आमचा संशय सुभाष वाघमारेवर आहे, असे सांगितले. तेव्हा पोलिसांना घेऊन त्यांनी सुभाषचे घर गाठले असता घरातील एका खोलीत खताच्या पोत्यामध्ये उलटे टांगलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. पोलिसांनी हे पोते काढले असता त्यात चिमुकल्या ग्यानीचा मृतदेह असल्याचे दिसल. गळफास देऊन सुभाषने मारुन टाकल्याचे स्पष्ट झाले. 

तसेच खोलीत सैलानी बाबाचा फोटो, लिंबू, हळद आदी संशयास्पद वस्तुही आढळल्या. त्या जप्त करुन अर्धापूरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विठ्ठल अंगुले यांनी सुभाषविरुध्द भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करुन नांदेडच्या जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी मनोरुग्ण असल्याचा दावा बचाव पक्षाने केला परंतु तो सहाय्यक सरकारी वकील यादव प्रकाश तळेगावकर यांनी खोडून काढला.

प्रथम जिल्हा न्यायाधीश ए. जी. मोहाबे यांनी 6 जुलै रोजी आरोपी सुभाषला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी १५ दिवस सश्रम कारावास, भा.दं.वि. कलम ३६४ नुसार दहा वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षाही मोहाबे यांनी सुनावली. घटनेच्या दिवसापासून आरोपी सुभाष कारागृहातच बंदिस्त आहे.

Web Title: Life imprisonment for the childs murderer Nanded Courts result