औरंगाबाद : पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

डोक्‍यात केले होते तीक्ष्ण हत्याराने वार, तेरगाव शिवारचे प्रकरण 

औरंगाबाद - पत्नीच्या डोक्‍यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठाविण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी शनिवारी (ता. 31) दिला. तुळशीराम दुर्बे (वय 45, रा. तेरगाव शिवार, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. शोभा तुळशीराम दुर्बे असे मृताचे नाव आहे. 

प्रकरणात शोभा यांचा भाऊ रोहिदास (27, रा. इंदेगाव, ता. पैठण) यांनी तक्रार दिली होती. शोभा आणि तुळशीराम यांच्या तीन मुलांपैकी एकाचा अपघाती मृत्यू झाला. दरम्यान, तुळशीराम हा शोभाला दारू पिऊन मुलांसमोरच शिवीगाळ व मारहाण करीत होता. मारहाणीबाबत शोभा नेहमी रोहिदासला सांगत होती. 22 मे 2016 ला रोहिदास हा गुळज येथे मजुरी कामाला गेलेला असताना रात्री नऊ वाजता त्याला बहीण मंगल डोंगरे (रा. जालना) हिने फोन करून सांगितले की, शोभाने मला फोन केला होता. तुळशीराम तिला मारहाण करीत असून तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. रात्री अकरा वाजता रोहिदास हा आई, पत्नी व मावसभावासह शोभाच्या घरी गेला. लाईट नसल्याने त्यांनी बॅटरीच्या मदतीने शोभाचा शोध घेतला असता ती एका कोपऱ्यात निपचित पडलेली होती व तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन रक्त निघत होते. रोहिदासने तिचा मृत्यू झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. 

प्रकरणात पाचोड पोलिस ठाण्यात तुळशीरामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता आर. सी. कुलकर्णी यांनी 12 साक्षीदारांचे जबाब नोंदविले. साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने तुळशीरामला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. प्रकरणात कुलकर्णी यांना ऍड. अविनाश कोकाटे व पैरवी जमादार भगवान जाधव यांनी सहकार्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: life sentence for wife's murder