वीज पडून पंधरा मेंढ्या दगावल्या 

प्रकाश ढमाले
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

भोकरदन तालुक्‍यातील रेलगाव शिवारातील घटना 

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) - भोकरदन तालुक्‍यातील रेलगाव शिवारात शुक्रवारी (ता. 18 ) वीज पडून पंधरा मेंढ्या दगावल्या आहेत. तर पिंपळगाव रेणुकाई परिसरात वादळवाऱ्यासह पडलेल्या पावसाने सोंगणी केलेल्या मका, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. 

पिंपळगाव रेणुकाई परिसरात पावसाने मोठा हैदोस घातल्याने शेतीकामे खोळंबली होती. मका, सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. आठ दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी उर्वरित वाचलेली पिके सावरत असतानाच शुक्रवारी पुन्हा परतीच्या पावसाने एक तास मुसळधार हजेरी लावली. यात कपाशी आडवी झाली असून मका, सोयाबीन पीक भिजले आहे. दरम्यान, रेलगाव शिवारात अचानक वीज पडल्याने पंधरा शेळ्या दगावल्याने मेंढपाळांवर मोठे संकट ओढवले आहे. आधीच्या पावसाने मका आडवा झाल्याने मकाचा चारा वाया गेला आहे. शेतकऱ्यांनी सावरत राहिलेला चारा सांभाळत पुन्हा सुरवात केली होती. मका सोंगणी केली होती; मात्र या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने मका चारा पूर्णतः भिजला असून चाराटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

पंचनामेच होईनात 
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती; मात्र या नुकसानीचे पंचणामे झालेच नाही तोच पुन्हा नुकसान शेतकऱ्यांच्या नशिबी आले असून किमान आतातरी पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lightning on fifteen sheep