नैसर्गिक आपत्ती रोखायची कुणी?  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon

लायटिंग अरेस्टर आणि सुरक्षित घर 
आकाशातून कोसळणाऱ्या विजेला झेलण्यासाठी लायटिंग अरेस्टरचा उपयोग करतात. अनेकदा विजा कोसळून आगीही लागतात यापांसून बचावासाठी लायटिंग अरेस्टर लाभदायी सिद्ध होते. वर्ष 1752 मध्ये बेंजामिन फ्रॅंकलिन यांनी लायटिंग अरेस्टरचा शोध लावला. लायटिंग अरेस्टर लावणे आणि घरात थांबले, की आपण विजांपासून सुरक्षित असतो, असा अनेकांचा गैरसमज असतो. लायटिंग अरेस्टर आसपासच्या उंच वस्तूंमध्ये सर्वाधिक उंचीवर आहे का, हेच लायटिंग अरेस्टरने मिळणारा फायदा दर्शविते. 

नैसर्गिक आपत्ती रोखायची कुणी? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे बसविण्यात आलेले आहेत. 

दरवर्षी पावसाळ्यात वीज पडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या शेकड्यात आहे; मात्र लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, त्यांनी आपापल्या इमारतींवर वीजरोधक यंत्रे बसवावेत, वीज पडत असताना काय काळजी घ्यावी, या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचे पावले उचलले नसल्याचेच समोर आले आहे. वीज पडून बहुतेकदा शेतात राबणाऱ्या किंवा मजुरी करून गुजराण करणाऱ्यांचाच मृत्यू होतो, हे प्रकार थांबावेत; तसेच सरकारी इमारतींवर वीज पडू नये, यासाठी औरंगाबाद शहरात केवळ चारच वीजरोधक यंत्र आहेत. मराठवाड्यात ही संख्या केवळ 30 आहे. यावरून प्रशासनास किती गाफील आहे, हे स्पष्ट होते. 

पावसाळ्यात विजांपासून वाचण्यासाठी वीजविरोधी यंत्र बसविणे गरजेचे आहे; मात्र प्रशासनाला याच्याशी काहीही देणेघेणे नसल्याचे पाहायला मिळते. शहरातील कार्यालयांवर हे यंत्र बसविण्याची तसेच बसवून घेण्याची जबाबदारी ही महापालिकांची आहे, तर अन्य सरकारी निमसरकारी कार्यालयांवर बसविण्याची जबाबदारी ही महसूल प्रशासनाची आहे; मात्र याकडे अक्षरश: डोळेझाकपणा सुरू आहे. विजेचे बळी हे प्रशासनाच्या अनास्थेचेच बळी आहेत, असेच म्हणावे लागेल. 

इथे आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील चार यंत्र 
औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतगाव (ता.वैजापूर), नवगाव (ता. पैठण), गोलटगाव (ता.औरंगाबाद) आणि मुर्डेश्‍वर (ता. सिल्लोड) या चार ठिकाणी ही यंत्रे बसविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून उपलब्ध झाली. मात्र, संपूर्ण मराठवाड्याचा कारभार हाकणाऱ्या विभागीय आयुक्‍त कार्यालयात विभागाची माहिती उपलब्ध नाही, नेमके कुठे कुठे ही यंत्र बसविण्यात आलीत, अशी विचारणा केली असता, माहिती घ्यावी लागेल, सध्या उपलब्ध नाही, असे उत्तरे देऊ वेळ मारून नेत आहेत. 

मराठवाड्यातील कुठे किती यंत्र ? 
औरंगाबाद ः 4 
जालना ः 2 
परभणी ः 4 
हिंगोली ः 2 
नांदेड ः 4 
बीड ः 6 
लातूर ः 4 
उस्मानाबाद ः 4 
एकूण ः 30 

कसा असतो विजेचा प्रवाह ? 
मॉन्सूनच्या आधी आणि मॉन्सून संपताना विजा चमकतात. वीज खाली आली की जीवित, वित्तहानी होते. आकाशातून कोसळणारा प्रचंड विद्युतप्रवाह म्हणजे वीज पडणे किंवा चमकणे होय. आकाशातून कोसळणाऱ्या विजेचा प्रवाह प्रचंड म्हणजे सरासरी सुमारे 25 हजार ऍम्पिअरपासून 40 लाख ऍम्पिअरपर्यंतचाही असू शकतो. वीज हा निसर्गचक्राचा भाग आहे. कमीत-कमी रोध असेल अशा वस्तू, ठिकाण किंवा व्यक्तीवर कोसळणे हा भौतिकशास्त्राचा नियम पाळण्याचे काम वीज करते. जीवघेणी वीज कधी, कुठे, कशी कोणावर कोसळते हे जाणून घेणे, त्यापासून स्वसंरक्षण करणे आणि कोणावर वीज कोसळलीच तर त्या व्यक्तीला मदत करून तिचे प्राण वाचविणे एवढेच या निसर्गचक्रात आपल्या हाती आहे. 

अशी घ्या काळजी? 
ओल्या भिंती आणि धातूंचे फर्निचर-घरातील ओल आलेल्या भिंती आणि त्यांच्या संपर्कात ठेवलेले टेबल, खुर्ची, सोफा, दिवाण, कपाटे आदी धातूच्या वस्तू विद्युत संवाहक आहेत. घराबाहेर वीज पडली तरी क्षणाचाही विलंब न करता या वस्तूंच्या माध्यमाने ती घरात व घरातील वस्तूंच्या संपर्काने आपल्यापर्यंत पोचू शकते. घरात लाकडी फर्निचरचा उपयोग करणे आणि भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच त्या दुरुस्त करून घेणे स्वसंरक्षणासाठी नक्कीच लाभदायी ठरेल. 

पाण्याच्या नळातूनही येऊ शकते वीज 
प्रत्येक घरात वापराच्या अथवा पिण्याच्या पाण्याची सोय ही धातूच्या पाइप आणि नळ्यातूनच होत असते. दूर कोठेही या पाइपवर वीज कोसळली तरी पाणी हे विद्युत संवाहक असल्याकारणाने प्रचंड विद्युतधारा या नळाच्या पाइपवाटे व्यक्तींपर्यंत पोचून प्राणहानी होऊ शकते. म्हणून गच्चीवर पाणी साठविण्याच्या टाक्‍यांचे गज व पाइप बाहेर निघालेले नसावेत. 

घरात सुरक्षित कसे व्हावे ? 
- विजा चमकत असताना वाहत्या पाण्याचा उपयोग करू नये. 
- स्वयंपाक, भांडी स्वच्छ करणे, कपडे धुणे टाळावे. 
- गॅस गिझर, शेगडी, गॅस सिलिंडरचे नॉब बंद करावेत. 
- अंघोळीसाठी जाणे कटाक्षाने टाळावे. 

विद्युत उपकरणाचा धोका? 
विजांची वादळे होत असताना सातत्याने विजा पडत असतात. विद्युत खांब उंच असल्याने त्यांवर विजा पडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय जमिनीवर पडणाऱ्या विजा जमिनीखाली असणाऱ्या विद्युतवाहक केबल्समधूनही (अंडरग्राऊंड) घरातील विद्युत उपकरणापर्यंत पोचून होणाऱ्या दुर्घटनांची संख्या मोठी आहे. म्हणून विजा कडाडत असताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे चांगले. 

विजा चमकताना घराबाहेर सुरक्षित कसे व्हावे? 
- पाणी हे विद्युत संवाहक आहे. 
- वाहत्या पाण्यात किंवा ओल्या जागी थांबू नये. 
- दूर पडलेल्या विजेची विद्युत वाहत येऊ शकते. 
- पाण्यासाठी हातपंपाचा किंवा शेती-मळ्यात वीजपंपाचा वापर करू नये. 
- पोहण्याचे तलाव, विहिरीतही उतरू नये. 
- मच्छीमारांनीही ताबडतोब बाहेर निघावे. 

झाडाखाली का थांबू नये? 
पावसामुळे ओली झालेली झाडे ही असुरक्षित आसरा आहेत. म्हणून विजा चमकताना झाडांखाली बिलकूल थांबू नये. झाडावर वीज कोसळली तरी झाडापासून विजेच्या शलाका निघून झाडाखाली थांबणाऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या संपर्कात येतात व विजेचा शॉक लागून व्यक्ती दगावू शकते. 

विजा पडताना कानाची सुरक्षितता हवी 
विजा पडतात तेव्हा त्या हवेला अक्षरश: जाळत मार्गक्रमण करतात. परिणामी, हवेची निर्वात पोकळी निर्माण होते. ही निर्वात पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा प्रचंड वेगाने एकाच पोकळीत शिरू पाहते आणि हवेचे थर एकमेकावर आदळल्याने प्रचंड गडगडाट ऐकू येतो. यातून निर्माण होणाऱ्या एकॉस्टिक शॉक वेव्हज या खिडकीची काचेची तावदानेही तोडून टाकतात. या आवाजामध्ये कानाचा नाजूक पडदा फाडून टाकण्याएवढी ऊर्जाही असते. म्हणून कानात बोटे घालून कानाच्या पडद्याचे संरक्षण करणे हा उत्तम उपाय होय. 

विजा पडत असताना असुरक्षित जागा 
- गोल्फ, फुटबॉल, क्रिकेट आदी मैदाने 
- उंच जागा, पहाड, टेकड्या, पाण्याच्या टाक्‍या 
- ओले शेतमळे, उंच झाडे, धातूचे शेड, धातूचे बसस्टॉप, धातूच्या तारा, धातूच्या तारांचे कुपण 
- खुले पिकनिक स्पॉट, समुद्र तट, ओल्या भिंती, वाहते पाणी, मोबाईल टॉवर्स, पाण्याचे पाइप व नळ आदी. 

यामुळे येतो ढगांमधून आवाज 
दोन ढगांची टक्कर झाली की विजा चमकतात, असे अनेकांनी ऐकले असेल; मात्र वैज्ञानिक सत्य काही वेगळेच आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ढगांतून जेव्हा विद्युतभार वाहून जातो तेव्हा वीज चमकते. ढगांच्या टकरीचा येथे काही एक संबंध नाही. 

लायटिंग अरेस्टर आणि सुरक्षित घर 
आकाशातून कोसळणाऱ्या विजेला झेलण्यासाठी लायटिंग अरेस्टरचा उपयोग करतात. अनेकदा विजा कोसळून आगीही लागतात यापांसून बचावासाठी लायटिंग अरेस्टर लाभदायी सिद्ध होते. वर्ष 1752 मध्ये बेंजामिन फ्रॅंकलिन यांनी लायटिंग अरेस्टरचा शोध लावला. लायटिंग अरेस्टर लावणे आणि घरात थांबले, की आपण विजांपासून सुरक्षित असतो, असा अनेकांचा गैरसमज असतो. लायटिंग अरेस्टर आसपासच्या उंच वस्तूंमध्ये सर्वाधिक उंचीवर आहे का, हेच लायटिंग अरेस्टरने मिळणारा फायदा दर्शविते. 

मोबाईल आणि विजांचा काहीच संबंध नाही. 
किरणकुमार जोहरे (भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ, पुणे) ः मोबाईल विजांना आकर्षित करतात, हाही गैरसमजच आहे. विशेषत: ऐकीव माहितीमुळे हा गैरसमज वेगाने पसरला गेला. मागे मुंबई येथे समुद्रकिनारी आपल्या मित्रांचे मोबाईल सांभाळणाऱ्या एका मुलीवर वीज कोसळली. मोकळ्या जागी उभे असल्याने उंची वाढल्यामुळे वीज आकर्षणाने अशी दुर्घटना झाली. सर्वांचे मोबाईल या मुलीकडे होते हे विजा आकर्षित होण्याचे कारण मुळीच नाही. व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितले तर मोबाईलच्या सिग्नल पॉवरपेक्षा, मोबाईल टॉवरवर मोबाईलरेंजसाठी कार्यरत असलेल्या असंख्य मोबाईल अँटेनांची सिग्नल पॉवर हजारोपट जास्त असते. अशा वेळी विजा या सेन्सर अँटेनावर कोसळणे किंवा त्यांची दिशा बदलताना दिसणे तरी आवश्‍यक आहे; मात्र असे होत नाही. यावरूही हे हे सत्य सिद्ध होते, की मोबाईल विजांना आकर्षित करीत नाही. 

loading image
go to top