लातूर जिल्ह्यातील दोनशे मतदान केंद्रांचे थेट प्रक्षेपण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

विविध कारणांमुळे नजर ठेवण्याची गरज असलेल्या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील तब्बल 201 मतदान केंद्रांवरील मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वेब कास्टिंग स्वरूपाचे प्रक्षेपण सर्वांनाच ऑनलाइन पाहता येणार असून मतदान कालावधीत अकरा तास ते सुरू राहणार आहेत. यातच काही संवेदनशील मतदान केंद्राचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. 

लातूर: विविध कारणांमुळे नजर ठेवण्याची गरज असलेल्या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील तब्बल 201 मतदान केंद्रांवरील मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वेब कास्टिंग स्वरूपाचे प्रक्षेपण सर्वांनाच ऑनलाइन पाहता येणार असून मतदान कालावधीत अकरा तास ते सुरू राहणार आहेत. यातच काही संवेदनशील मतदान केंद्राचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही प्रत्येक मतदारसंघात सखी, सक्षम व आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. नऊ) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत यावेळी उपस्थित होते. श्रीकांत म्हणाले, ""थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून मतदान केंद्रातील हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. विविध निकषांतून या केंद्राची निवड करण्यात आली आहे.

यात लातूर ग्रामीण व अहमदपूर मतदारसंघातील प्रत्येकी 36, लातूर शहर व औसा मतदारसंघातील प्रत्येकी 31, उदगीर मतदारसंघातील 33, तर निलंगा मतदारसंघातील 34 मतदान केंद्रांचा समावेश आहे. प्रक्षेपणाच्या निरीक्षणासाठी स्वतंत्र पथकाचीही स्थापना केली आहे. मतदानाच्या काळात पावसाचे संकेत असून त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी व व्यवस्था केली आहे. लातूर शहर मतदारसंघात दोन बॅलेट युनिटवर मतदान घ्यावे लागणार असल्याने मतदारसंघासाठी आवश्‍यक संख्येने बॅलेट युनिटचा पुरवठा करण्यात आला आहे. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सखी, तर दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सक्षम मतदान केंद्राचा उपक्रम सर्व मतदारसंघांत राबविला जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघात असे एक केंद्र असणार आहेत. यासोबत मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी आदर्श मतदान केंद्रांचीही स्थापना करण्यात येणार आहे.'' जिल्ह्यात नऊ हजार 634 दिव्यांग मतदार असून त्यांची मतदारयादीवर स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे.

या मतदारांना लोकसभेप्रमाणेच मतदानासाठी निवडणूक रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आतापर्यंत आचारसंहिता भंग; तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आहेत. मतदारांच्या सोयीसाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक चोवीस तास सुरू राहणार असल्याचेही श्रीकांत यांनी सांगितले. 

महिन्यात तीन हजार मतदार 
विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केल्याच्या 31 ऑगस्टनंतर 34 दिवसांत जिल्ह्यात तब्बल दोन हजार 902 मतदारांची वाढ झाली आहे. चार ऑक्‍टोबरपर्यंत नोंदणी केलेल्या या मतदारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार असून, त्यांची स्वतंत्र पुरवणी यादी केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निरंतर पुनरीक्षण कार्यक्रमातून ही मतदार नोंदणी झाल्याचेही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Live web cast of two hundred polling booth in Latur district