कर्ज न घेताही सातबाऱ्यावर लाखाचा बोजा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

तालुक्‍यातील सावळसूर येथील एका शेतकऱ्याच्या नावे कर्ज न उचलताच सातबाऱ्यावर एक लाख रुपये कर्जाचा बोजा चढविण्यात आला आहे. तलाठ्याकडून झालेल्या चुकीची गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्ती केली जात नसल्याने दिव्यांग असलेल्या या ज्येष्ठ शेतकऱ्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उमरगा - तालुक्‍यातील सावळसूर येथील एका शेतकऱ्याच्या नावे कर्ज न उचलताच सातबाऱ्यावर एक लाख रुपये कर्जाचा बोजा चढविण्यात आला आहे. तलाठ्याकडून झालेल्या चुकीची गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्ती केली जात नसल्याने दिव्यांग असलेल्या या ज्येष्ठ शेतकऱ्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सावळसूर येथील शेतकरी विष्णू रामा कांबळे हे दिव्यांग आहेत. त्यांची सावळसूर शिवारात गट क्रमांक ४२ मध्ये शेती आहे. त्यांनी कुठल्याही राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंक किंवा पतसंस्थेचे कर्ज घेतलेले नाही. मात्र, त्यांच्या ऑनलाइन सातबाऱ्यावर मातोळा (ता. उमरगा) येथील हनुमान नागरी बिगरशेती पतसंस्थेचे एक लाख रुपये कर्ज दाखविण्यात आले आहे. आपण एक रुपयाचेही कर्ज न उचलता सातबाऱ्यावर बोजा दाखविण्यात येत असल्याने श्री. कांबळे हताश झाले. त्यांनी तलाठ्याला विचारणा केली, मात्र हा प्रकार माझ्या काळात झाला नसल्याचे सांगून त्यांनी जबाबदारी झटकली.

त्यानंतर याबाबत पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. त्यांनीही हा प्रकार आमच्याकडून झाला नसल्याचे सांगितले. मूळात ही चूक तलाठी दप्तरातून झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. बाबळसूर येथील एका शेतकऱ्याने पतसंस्थेकडून कर्ज घेतले आहे, त्याचा बोजा सावळसूरच्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर ओढण्यात आला आहे. याबाबत तहसील कार्यालयातही अर्ज दिला गेला, मात्र ऑनलाइन सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करून दिला जात नाही. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने हताश झालेल्या श्री. कांबळे यांनी आता या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्याने दखल घेऊन ऑनलाइन सातबाऱ्यावरील बोजा कमी करून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय धोक्‍यात आल्याने शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. त्यात महसूल विभागाकडून होणाऱ्या चुकीच्या प्रकारामुळे शेतकऱ्याला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: load on satbara without loan confusion