अाधी लोडशेडिंग, मग बिघाड!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - सायंकाळी साडेसहापर्यंत लोडशेडिंग झालेल्या भागाला विद्युत पुरवठा सुरू होताच बिघाड झाल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत रोष व्यक्त केला. अखेर पोलिसांना पाचारण करून चार तासांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. हा प्रकार सोमवारी (ता.२२) रात्री घडला. 

औरंगाबाद - सायंकाळी साडेसहापर्यंत लोडशेडिंग झालेल्या भागाला विद्युत पुरवठा सुरू होताच बिघाड झाल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत रोष व्यक्त केला. अखेर पोलिसांना पाचारण करून चार तासांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. हा प्रकार सोमवारी (ता.२२) रात्री घडला. 

एन- सहा भागातील स्मशानभूमीसमोर ३३ केव्ही सबस्टेशनच्या हाय टेन्शन तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. ती दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या चमूला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संपूर्ण शहराची वीज बंद करा, मगच काम करा, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. त्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला.

नागरिकांचा रोष पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर वसूरकर, निर्मला परदेशी यांनी फौजफाटा आणत नागरिकांची समजूत घातली. दरम्यान, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी हेही या ठिकाणी तळ ठोकून होते. अखेर महावितरणने सगळा गोंधळ झाल्यावर साडेदहाला विद्युत पुरवठा सुरळीत केला. महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस, अतिरिक्त अभियंता अविनाश चव्हाण यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी हा बिघाड रात्री पावणेअकराला दुरुस्त केला. 

हा झाला बिघाड
तुटलेली विद्युतवाहिनी सिडको ३३ केव्ही सबस्टेशनची आहे. त्यावर बहुतांश जुन्या शहराचा भाग येतो. या बिघाडाने एकूण सहा फिडर आणि ११ केव्ही क्षमतेचे दोन सबस्टेशन बाधित झाले. त्यामुळे परिसरातील शहागंज निजामुद्दीन चौक, औरंगाबाद टाइम्स कॉलनी, गणेश कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसर, सिडकोतील एन- सहा आणि परिसर, रोशन गेट, बायजीपुरा, जिन्सी आणि परिसर या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

साहित्याची नासधूस
या बिघाडाने शहराच्या मध्यभागातील अनेक वसाहतींची वीज गायब झाल्याने अंधाराचे साम्राज्य होते. संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या मदनी चौकातील युनिटवर दगडफेक करीत गोंधळ घातला. यात बायोमेट्रिक मशीन, मीटर आदी साहित्याची नासधूस केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यातही घेतले.

Web Title: Load shading Electricity Work