मराठा युवकांच्या कर्जमंजुरीला अमराठी खोडा : पहा video

जालना : पत्रकार परिषदेत बोलताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील. यावेळी आमदार संतोष दानवे व इतर.
जालना : पत्रकार परिषदेत बोलताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील. यावेळी आमदार संतोष दानवे व इतर.

जालना - राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योग , रोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत अकरा हजार मराठा तरुणांना साडेपाचशे कोटी रुपयांचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जवाटप करण्यात आले आहे; मात्र राज्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये अमराठी बॅंक व्यवस्थापक असल्याने कर्जमंजुरी होण्यास अडचणी येत असल्याचे पुढे आले आहे, असा दावा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता. 24) घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. यावेळी आमदार संतोष दानवे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी श्री. पाटील म्हणाले, की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांना उद्योगासाठी कर्ज देण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत 11 हजार मराठा तरुणांना साडेपाचशे कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. कर्जवाटपाची ही प्रक्रिया काही प्रमाणात संथ आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये अमराठी भाषिक बॅंक व्यवस्थापक आहेत. त्यांना ही योजना समजत नाही. त्यामुळे ज्या बॅंकेत अमराठी बॅंक व्यवस्थापक आहे, त्या ठिकाणी एका मराठी अधिकाऱ्याकडून या योजनेचे काम करून घेण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

बैठकीला बॅंक व्यवस्थापकांची दांडी 
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बॅंक व्यवस्थापक, अधिकारी आणि मराठा संघटना, लाभार्थी यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या व्यवस्थापकांनी दांडी मारली. ज्या बॅंक व्यवस्थापकांनी बैठकीला हजेरी लावली नाही, त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात येतील, असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

केवळ पाचशे तरुणांना कर्ज 
जालना जिल्ह्यातील किमान अडीच हजार मराठा तरुणांना कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट बॅंकांना दिले आहे; मात्र आतापर्यंत जिल्ह्यात केवळ पाचशे मराठा तरुणांना कर्ज मंजूर झाले असून 27 कोटी 22 लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com