कल्याण निधीचा पोलिसांना आधार 

उमेश वाघमारे 
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

जालना : अठरा महिन्यांत 311 जणांना बिनव्याजी कर्ज 

जालना -  आर्थिक अडचण आल्यानंतर प्रत्येकजण कर्जासाठी बॅंकांकडे धाव घेतो. अर्थात, पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मात्र कल्याण निधीचा मोठा आधार आता मिळत आहे. गृहविभागाने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पोलिस कल्याण निधीमधून बिनव्याजी कर्ज देण्याची सोय केली आहे. यात मागील अठरा महिन्यांत जालना जिल्ह्यातील 311 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्जवाटप झालेले आहे. 

पोलिस अधिकारी, कर्मचारी हे सामान्यांच्या संरक्षणासाठी सतत कर्तव्यावर असतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे स्वतःसह कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. परिणामी अनेकदा व्यक्ती अडचणी निर्माण होऊन त्यांच्यावर आर्थिक संकट येते; मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या पोलिसांच्या आर्थिक मदतीला क्वचितच एखाददुसरा धावून जातो; परंतु पोलिसांवर आलेल्या आर्थिक संकटात त्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी गृहविभागाकडून पोलिस कल्याण निधीमधून 50 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येते. जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 363 पोलिसांनी पोलिस कल्याण निधीमधून कर्ज मिळावे, यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 311 पोलिसांना पोलिस कल्याण निधीमधून कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांची आर्थिक अडचण दुरू होण्यास मदत झाली आहे. 

पाच महिन्यांत परतफेड 
पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलिस कल्याण निधीतून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर त्याची पाच महिन्यांत परतफेड करावी लागते. त्यासाठी कर्ज घेतलेल्या पोलिसांच्या पगारातून ही रक्कम कपात केली जाते. 

कल्याण निधीलाही उत्पन्नाचा स्रोत 
जालना पोलिस कल्याण निधीला उत्पन्नाचा स्रोत आहे, हे विशेष. शहरातील मध्यवर्ती भारती कॉम्प्लेक्‍समध्ये 17 ते 18 गाळे आहेत. त्याचे मासिक भाडे रक्‍कम ही पोलिस कल्याण निधीमध्ये जमा होते; तसेच शोभा मंगलकार्यालय समारंभासाठी भाडेतत्त्वावर दिले जाते, ही रक्‍कम ही निधीत भर टाकणारी असते. 

आर्थिक अडचण असल्यावरच पोलिसांकडून पोलिस कल्याण निधीमधून कर्जाची मागणी केली जातो. त्यामुळे आलेल्या अर्जांना मंजुरी देत त्यांना वेळेत कर्ज मंजूर करण्यावर भर असतो. यापुढेही खरी अडचण असणाऱ्यांना पोलिस कल्याण निधीतून कर्ज दिले जाईल. 
- चैतन्य एस.
पोलिस अधीक्षक, जालना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loan for police