कर्जमाफी दूरच... पीकविम्याचे पैसेही खाल्ले! 

राजेभाऊ मोगल
बुधवार, 4 जुलै 2018

औरंगाबाद - सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा डंका राज्यभर वाजविण्यात आला. त्यानंतर केवळ शहरातच नव्हे, तर गावोगावी ठिकठिकाणी पोस्टरबाजी झाली. मात्र, याचा असंख्य शेतकऱ्यांना लाभच मिळाला नसल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे कर्जमाफी झाल्याचे सांगायचे अन्‌ दुसरीकडे पीकविम्याचे मिळणारे पैसेच कर्जात कपात झाले म्हणायचे, असा गोरखधंदा बॅंकांनी चालविला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्‍त होत आहे. 

औरंगाबाद - सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा डंका राज्यभर वाजविण्यात आला. त्यानंतर केवळ शहरातच नव्हे, तर गावोगावी ठिकठिकाणी पोस्टरबाजी झाली. मात्र, याचा असंख्य शेतकऱ्यांना लाभच मिळाला नसल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे कर्जमाफी झाल्याचे सांगायचे अन्‌ दुसरीकडे पीकविम्याचे मिळणारे पैसेच कर्जात कपात झाले म्हणायचे, असा गोरखधंदा बॅंकांनी चालविला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्‍त होत आहे. 

उदाहरण पहिले
गावागावांत नेमके काय चित्र आहे, हे जाणून घेण्यासाठी मंगळवारी (ता. तीन) शहरापापासून काही अंतरावर असलेल्या आडगाव सरक येथे वास्तव जाणून घेण्यासाठी भेट दिली असता, पीकविम्याचे पैसे थकीत कर्जामध्ये वळविण्यात येत असल्याचा आरोप तुकाराम ज्ञानदेव पठाडे यांनी केला. खरे तर पठाडे उसनवारी करून केलेल्या पेरणीनंतर काही दाणे उगवले का, हे पाहण्यासाठी शेताकडे निघाले होते. त्यांना कर्जमाफीचा विषय काढला असता, ते म्हणाले, की माझ्या नावे एक लाख पाच हजार थकीत पीककर्ज आहे. हे पैसे भरले तरच नवीन कर्ज मिळेल. शिवाय, थकीत कर्ज भरले तरच मंजूर झालेला 11 हजार रुपये पीकविमा मिळेल, असे सांगितले. कर्जमाफी झाली नाही आणि आता बॅंकही पैसे देईना, म्हणून इकडून तिकडून पैसे आणून कशीबशी पेरणी केली. चांगला पाऊस पडला तर लोकांचे पैसे देता येतील, अन्यथा पुन्हा अन्य ठिकाणाहून व्याजाने पैसे आणून शेती करावी लागेल.'' 

उदाहरण दुसरे 
गावांसाठी ठरवून दिलेल्या बॅंकामध्ये ही स्थिती आहे. तांड्यावरील रामदास हारजी पवार यांच्याकडे गेलो असता, त्यांनी तर फारच गंभीर आणि मजेशीर गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, माझ्याकडे बॅंकेचे 60 हजार कर्ज होते. 10 हजार रुपये पीकविमा मंजूर झाला; मात्र हे पैसे पाहिजे असतील तर थकीत कर्ज भरा, असा दम बॅंकेनी दिला. ऑनलाइन अर्ज भरलेला आहे. कर्जमाफीचे काय झाले, हे विचारायला गेलो तर काहीच बोलेनात. आता कुणाकुणाच्या पाया पडू? त्यामुळे दहा दिवसांपूर्वी व्याजासह 71 हजार शंभर रुपये भरून टाकले. त्यानंतर मला 73 हजार रुपये नवीन पीककर्ज मिळाले. त्यातून 2 हजार रुपये पीकविम्याची कपात झाली. हाती एक हजार रुपये राहिले असले, तरी चौकशा करण्यासाठी इकडे तिकडे जाण्यावरच त्यापेक्षा जास्त खर्च झाला. त्यामुळे हाती भोपळाही शिल्लक राहिला नाही! 

आणखी काही उदाहरणे 
दादाराव पठाडे यांच्याकडे एक लाख कर्ज होते. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कडूबाई भास्कर पठाडे यांच्याकडे 99 हजार रुपये कर्ज होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी याचा भरणा केला. त्यांना मंजूर झालेला पीकविमा मिळाला. सुमनबाई अशोक सोमदे यांच्याकडे 47 हजार रुपये कर्ज आहे. गतवर्षी लाल्या रोगाचे 13 हजार रुपये मंजूर झाले होते. ते पैसे कर्जाच्या खात्यात वळविण्यात आले. कांताबाई सोमदे यांच्याकडे 80 हजार कर्ज असून, 20 हजार रुपये पीकविमा मंजूर झालेला आहे; मात्र 20 हजार रुपयांची मागणी केली की थकीत कर्ज भरा, असे सांगितले जाते. 

साडेपाच हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात पिण्यासाठी टॅंकरने पाणी आणावे लागते. त्यात पेरणीसाठी बॅंकेकडे कर्ज मागावे लागते. उसनवारी, खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे आणून शेती करायची. चांगले पीक आले तरच वर्षभर पुरेल एवढे धान्य शिल्लक राहते. लोकांचे पैसे फिटतात. अन्यथा कर्जाच्या ओझ्याखाली दबावे लागते, कृष्णा मोकळे सांगत होते.

Web Title: loanwaiver crop insurance money