ग्राहकांविना फुले कोमेजण्याच्या मार्गावर 

बाबासाहेब गोंटे
Sunday, 5 April 2020

लग्नसराई, धार्मिक उत्सवात फुलांना मागणी वाढून दोन पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, संचारबंदी लागू झाली. परिणामी ग्राहकांविना बहरलेली फुले आता कोमेजण्याच्या मार्गावर आहेत.

अंबड (जि.जालना) - पारंपारिक पिकांऐवजी प्रयोगशीलता जपत शेतकऱ्यांनी फूलशेतीला प्राधान्य दिले. लग्नसराई, धार्मिक उत्सवात फुलांना मागणी वाढून दोन पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, संचारबंदी लागू झाली. परिणामी ग्राहकांविना बहरलेली फुले आता कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. 

उन्हाळयात विविध धार्मिक कार्यक्रम, यात्रा, जत्रा उत्सव, लग्नसमारंभासह आदींसाठी गुलाब, शेवंतीच्या फुलाला मोठया प्रमाणात मागणी असते.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

त्यामुळे धनगरपिंपरी येथील शेतकरी रामेश्वर मोढेकर यांनी दोन एकर जमिनीमध्ये नोव्हेबर २०१९ मध्ये गुलाब तीन हजार झाडे तर शेवंतीची पंचवीस हजार रोपांची लागवड केली. यासाठी रोप, खत, औषधी, ठिबक सिंचन, मेहनत आदींसाठी सरासरी ऐंशी हजार रुपयापर्यंत खर्च आला. गुलाब, शेवंतीची फुले विक्रीला आली.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

कोरोनामुळे संचारबंदी लागू होण्यापुर्वी मोढेकर यांनी केवळ एक रुपया नगाप्रमाणे तीनशे गुलाब व वीस रुपये किलोप्रमाणे पन्नास किलो शेवंतीच्या फुलांची विक्री केली. नंतर कोरोनामुळे संचारबंदी लागु झाली. यामुळे बाजारपेठ, वाहतुक व्यवस्था ठप्प झाली. यामुळे फुलविलेल्या फुलांची विक्री करताच येऊ शकली नाही. परिणामी बहरलेली ही फुले कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. 

दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यातुन सावरत पारंपरिक पिकांला फाटा देत फुलशेतीकडे लक्ष केंद्रीत केले. फुलशेतीतून उत्पन्न मिळेल अशी आशा बाळगुन होतो. मात्र कोरोनामुळे सर्वच ठप्प झाले.फुलशेतीतून पाहिलेले उत्पन्नाचे स्वप्न भंग पावले आहे. 
- रामेश्वर मोढेकर 
प्रयोगशिल शेतकरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lock down affected to flower farm