लातूर शहरासह बाजूच्या वीस गावांत पुन्हा लॉकडाउन

 Lockdown again in Latur city
Lockdown again in Latur city

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पंधरा दिवसांपासून सुरू असलेले लॉकडाउन शुक्रवारी (ता. ३१) संपत असतानाच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शनिवारपासून (ता. एक) लातूरसह परिसरातील वीस गावांत पुन्हा पंधरा दिवसांचे लॉकडाउन लागू केले आहे.

पहिल्या लॉकडाउनच्या तुलनेत थोडी शिथिलता देण्यात आली असून, जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायती; तसेच ग्रामीण भागासाठी लॉकडाउनचे स्वतंत्र आदेश काढण्यात आले आहेत. नगरपालिका व नगरपंचायतीच्या क्षेत्रात सात दिवसांचे लॉकडाउन लागू केले असून, ग्रामीण भागात लॉकडाउन मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. 
शहरासह गंगापूर, पेठ, चांडेश्वर, खोपेगाव, कव्हा, कातपूर, बाभळगाव, सिकंदरपूर, बसवंतपूर, खाडगाव, पाखरसांगवी, कोळपा, हरंगूळ (बु.), बोरवटी, मळवटी, वरवंटी, आर्वी, वासनगाव, हनमंतवाडी व महाराणा प्रतापनगर या गावांत १ ते १५ ऑगस्टदरम्यान लॉकडाउन लागू करण्यात आले आहे.

त्यानंतरच्या काळासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. लॉकडाउनमध्ये पूर्वीप्रमाणेच भाजीपाला व फळांची ठोक व किरकोळ विक्री; तसेच मटण, चिकन, अंडी व मासे विक्री बंद राहणार आहे. सलून, ब्युटी पार्लर, केशकर्तनालय, क्रीडा संकुल, उद्याने, मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक, ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरवठा, हॉटेल, लॉज, बिअर बार, उपाहारगृह, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट, शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना बंदी आहे. सार्वजनिक, खासगी बससेवा, ट्रक, टेंपो, ट्रेलर व ट्रॅक्टर बंद राहणार आहेत. बांधकामे, मंगल कार्यालय, हॉल, लग्न व स्वागत समारंभ बंद राहणार असून, केवळ नोंदणी पद्धतीने विवाह सुरू राहणार आहेत. सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम व सभांवरील बंदी कायम असून शिवभोजन थाळी, धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळे व शहरातील सर्व खासगी कार्यालयेही बंद राहणार आहेत. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
 

लातूर व वीस गावांत हे चालू राहील 
किराणा व सुपर मार्केट न उघडता दुपारी बारापर्यंत घरपोच मालाचा पुरवठा, दूध विक्री वितरण सकाळी दहापर्यंत, रुग्णालयाशेजारील व ऑनलाइन औषध विक्री २४ तास, तर अन्य ठिकाणची औषध विक्री १५ ऑगस्टपर्यंत सकाळी सात ते दुपारी १२ पर्यंत, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आदी ई कॉमर्स सेवा घरपोच, वाहनांचे न्यायालये, केंद्र व राज्य सरकारची कार्यालये, केवळ सरकारी व अत्यावश्यक कारणांसाठी पेट्रोल व गॅसपंप; तसेच वाहनांचे सर्व्हिसिंग सेंटर, एलपीजी गॅस घरपोच तर सर्व बँकांचे कामकाज किमान मनुष्यबळासह सुरू राहणार आहे. अंत्यविधीसाठी वीस व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असून जार व टँकरने पाणीपुरवठा दुपारी बारापर्यंत करता येणार आहे. 
 
नगरपालिका क्षेत्रात सात दिवस लॉकडाउन 
नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात १ ते ७ ऑगस्टदरम्यान लॉकडाउन करण्यात आले तरी त्यात शिथिलता देण्यात आली आहे. किराणा, भाजीपाला, बेकरी व फळांची दुकाने, मटन, चिकन, अंडी विक्रीचे दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात सुरू राहणार आहेत. शिवभोजन थाळी, अत्यावश्यक सेवेशी निगडित नसलेले कारखाने उद्योग, सर्व्हिसिंग सेंटर, गॅरेज सुरू राहणार असून, मंगल कार्यालय व लग्नसमारंभ बंद राहणार आहेत. 
 
ग्रामीण भागात मोठी शिथिलता 
जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रासाठी ८ ते ३१ ऑगस्ट, तर उर्वरित ग्रामीण भागासाठी १ ते ३१ ऑगस्टदरम्यान मोठी शिथिलता दिली आहे. त्यानुसार बाजारपेठ, मॉल्स, व्यापारी संकुल, सकाळी नऊ ते सायंकाळी सातदरम्यान सुरू राहणार आहे. जिल्ह्यांतर्गत हालचाली व वाहतूक सुरू राहणार असून ५० क्षमतेने बससेवा सुरू राहणार आहेत. शैक्षणिक संस्था बंद राहणार असून सलून व केशकर्तनालये बंधनासह सुरू राहणार आहेत. खासगी वाहनांना मोजक्या प्रवासी क्षमतेने वाहतुकीला परवानगी असून मंगल कार्यालये व लग्नासह अन्य समारंभ बंद राहणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com