Lockdown : उस्मानाबादेत दोन वाजेपर्यंतच सुरू राहणार किराणा दुकाने

सयाजी शेळके
सोमवार, 13 जुलै 2020

शहरातील किराणा दुकान संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळा आदेश काढला आहे. शहरातील सर्व किराणा दुकानेरोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती.

उस्मानाबाद  : शहरातील किराणा दुकाने दुपारी दोनपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. 

शहरात कोरोणाचा संसर्ग वाढत आहे. रोज पाच ते सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. गेल्या आठवड्यात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील सर्वच नगरसेवकांनी लॉकडाउन करण्यासंदर्भात आग्रही भूमिका मांडली होती. पालिकेच्या सभेत ठराव झाल्यानंतर त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणारे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार
जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात सोमवारपासून (ता. १३) संचारबंदी लागू केली. यामध्ये औषधी दुकान भाजीपाला, किराणा, दूध आदी जीवनावश्यक सेवा देणाऱ्या अस्थापना सुरू आहेत.

दरम्यान, शहरातील किराणा दुकान संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळा आदेश काढला आहे. शहरातील सर्व किराणा दुकानेरोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. आता यामध्ये बदल करीत दुपारी दोनपर्यंत सर्व किराणा दुकाने सुरू राहणार आहेत. दरम्यान, सोमवारी आदेश काढले असून तत्काळ अंमलबजावणी सुरू झाल्याने अनेक किराणा दुकानदारांना याची कल्पना नव्हती. आदेश त्यांच्यापर्यंत पोचण्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व किराणा दुकानदारांनी या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले.

नियम मोडणाऱ्या ३३९ जणांवर कारवाई 
उस्मानाबाद ः
नियम मोडणाऱ्या ३३९ जणांवर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान कारवाई केली. त्यांच्याकडून ९१ हजार ७०० रुपयांचा दंड घेण्यात आला. कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक शाखेच्या सहकार्याने शनिवारी (ता. ११) नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदीदरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत ३३९ कारवायांत ९१ हजार ७०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.  
 
उमरगा : ६२ वर्षीय महिलेचा कोवीड रुग्णालयात मृत्यू
उमरगा (जि. उस्मानाबाद)  :
येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात रविवारी (ता. १२) दुपारी तुरोरी (ता. उमरगा)  येथील एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यापूर्वी चार ज्येष्ठांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

परभणी जिल्ह्यात तीन दिवसांची तर गंगाखेडला १९ जूलैपर्यंत संचारबंदी...

विषाणूचा संसर्ग त्यात मधूमेह, रक्तदाब, मानसिक तणाव ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. रविवारी दुपारी एकच्या दरम्यान तुरोरी येथील ६२ वर्षीय महिला अति गंभीर स्थितीत कोविड रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार त्या महिलेचा प्रथम स्वॅब घेण्यात आला. त्यानंतर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, जववळपास एक तासानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती चाचणीच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल.

सध्या महिला कोरोना संशयित असल्याने रुग्णालय प्रशासनाने कोविड पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याविषयीचे पत्र नगरपालिकेला दिले आहे. सोमवारी (ता.१३) सकाळी त्या महिलेवर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत पालिका व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यामार्फत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान शनिवारी (ता. ११) पाठविलेल्या २७ स्वॅबचा अहवाल रविवारी उशिरा येण्याची शक्यता नाही असे सूत्राने सांगितले तर रविवारी ३८ जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले आहे.

(संंपादन : विकास देशमुख)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown in Osmanabad city