लॉकर तोडता न आल्याने वाचले अर्धा किलो सोने 

मनोज साखरे
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

  औरंगाबादेत सराफा दुकानात चोरी; तीन किलो चांदी लंपास

औरंगाबाद - उस्मानपुऱ्यातील पीरबाजार येथील खंडाळकर ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरांनी तीन किलोंपेक्षा जास्त चांदीचे दागिने चोरी केले. विशेषत: दुकानातील लॉकर तोडता न आल्याने आतील अर्धा किलो सोने चोरांच्या हाती लागले नाही. ही घटना रविवारी (ता. एक) उघडकीस आली. चोरीचा प्रकार 31 ऑगस्टदरम्यान घडला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मनोज रमेश दाभाडे (रा. दिशा करिष्मा अपार्टमेंट, अंगुरीबाग) यांचे पीरबाजार येथील राम मंदिरालगत खंडाळकर ज्वेलर्स नावाने सोन्या, चांदीचे दुकान आहे. 30 ऑगस्टला रात्री दाभाडे साडेआठच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. शनिवारी (ता. 31 ऑगस्ट) पीरबाजार बंद असल्याने त्यांनी दुकान उघडले नव्हते.

रविवारी सकाळी पावणेअकरा वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले. त्यावेळी शटर उचकटण्याचा प्रयत्न झाल्याचा त्यांना संशय आला; परंतु दोन्ही कुलूप चांगल्या स्थितीत होते. अधिक चाचपणी केल्यानंतर काऊंटरच्या व शोकेसच्या ड्राव्हरमधील चांदीचे तीन किलो दोनशे ग्रॅम दागिने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोनेही गेले असेल असा संशय वाटल्याने त्यांनी लॉकरकडे धाव घेत पाहणी केली, तेव्हा ते सुस्थितीत आढळले व त्यातील दागिने वाचले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: locker remains unbroken 500gm gold intact