Loksabha 2019 : बीडमध्ये भाजपसोबत नाही : विनायक मेटे 

शनिवार, 16 मार्च 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "शिवसंग्राम'चा कायम सन्मान केला. मंत्रिपद देण्याचा शब्द पाळला नसला, तरी मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्न पोटतिडकीने सोडविले. राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले दोन महामंडळाचे अध्यक्षपद आणि विविध 34 महामंडळांवर "शिवसंग्राम'ला प्रतिनिधित्व देऊन सन्मान केला.

बीड : "भारतीय जनता पक्षाने राजकीय शब्द पाळला नसला तरी "शिवसंग्राम'ने अजेंड्यावर आणलेल्या समाजाच्या प्रश्नांना न्याय दिला आहे. महामंडळांवर मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन सन्मान केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात "शिवसंग्राम' भाजपसोबतच असेल मात्र जिल्ह्यात नाही,'' असे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी स्पष्ट केले. 

विविध महामंडळांवर नेमणुका झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि बैठक शुक्रवारी (ता. 15) श्री. मेटे यांच्या उपस्थितीत झाली. मेटेंपूर्वी बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधी सूर आळविला. मात्र विनायक मेटे जे भूमिका घेतील ती मान्य असेल, असेही पदाधिकारी म्हणाले.

त्यावर मेटे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "शिवसंग्राम'चा कायम सन्मान केला. मंत्रिपद देण्याचा शब्द पाळला नसला, तरी मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्न पोटतिडकीने सोडविले. राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले दोन महामंडळाचे अध्यक्षपद आणि विविध 34 महामंडळांवर "शिवसंग्राम'ला प्रतिनिधित्व देऊन सन्मान केला. मात्र जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी कायम अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे राज्यात शिवसंग्राम भाजपसोबत असला तरी जिल्ह्यात नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांनाही कळविणार आहे.'