नऊ देशांच्या बुद्ध संस्कृतीचे लोकुत्तरा महाविहारात दर्शन!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पर्यटनाच्या यादीत मानाचा तुरा; महाविहाराचा पहिला टप्पा पूर्ण, पाच वर्षांत पूर्ण होणार काम

पर्यटनाच्या यादीत मानाचा तुरा; महाविहाराचा पहिला टप्पा पूर्ण, पाच वर्षांत पूर्ण होणार काम
औरंगाबाद - तथागतांच्या दु:ख मुक्तीचा मार्ग सहज कळावा आणि समाजाला त्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने साकारण्यात येत असलेल्या लोकुत्तरा महाविहाराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या महाविहारात नऊ देशांच्या बुद्ध संस्कृतीचे दर्शन होणार असून, प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण होणार आहे.

तथागत भगवान गौतम बुद्धांचा दु:ख मुक्तीचा मार्ग जसाच्या तसा मानवापर्यंत पोचवावा, या प्रमुख उद्देशाने महाविहाराचे निर्माण कार्य होत असल्याची माहिती महाविहाराचे सर्वेसर्वा आणि अखिल भारतीय भिक्‍खू संघाचे राज्य अध्यक्ष भदंत बोधिपालो महाथेरो यांनी दिली. विदेशी बुद्ध राष्ट्रांतील उपासक, उपासिका आणि स्थानिक उपासकांनी दिलेल्या दानाच्या माध्यमातून हे महाविहार साकरण्यात येत आहे. भदंत काश्‍यप थेरो आणि भदंत सुगत बोधी यांच्यासह "लोकुत्तरा चॅरिटेबल ट्रस्ट'च्या बांधकाम समितीमार्फत हे काम केले जात आहे.

निसर्गरम्य वातावरण
औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील चौका घाटाजवळ डोंगरपायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात महाविहारासाठी 1998 मध्ये सात एकर जागा घेण्यात आली. जागा घेतल्यानंतर "लोकुत्तरा महाविहार' नावाने चॉरिटेबल ट्रस्टची 2003 मध्ये स्थापना करण्यात आली. पहिल्या टप्प्याच्या कामांचे भूमिपूजन 2006 मध्ये करण्यात आले. पहिल्या टप्प्यात साधारण दहा हजार चौरस फुटांचे भव्यदिव्य असे विपश्‍यना केंद्र साकारण्यात आले. अजिंठा लेणीचे खांब, सांचीचा स्तूप आणि बुद्धगयाचा डोम (कळस) असे एकत्रीकरण करून हे केंद्र उभे राहिले आहे. या केंद्राला चार आर्यसत्य सांगणारे चार दरवाजे आणि अंतर्गत बाजूला त्रिलक्षण सांगणारे तीन दरवाजे बुद्धांच्या शिकवणीची साक्ष देत आहेत. महाविहाराच्या पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे.

दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरवात
येत्या ऑक्‍टोबर महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरवात होत आहे. दुसऱ्या टप्प्यात तीनमजली भव्यदिव्य प्रत्यक्ष महाविहार उभे राहणार आहे. या महाविहारात भारतासह तिबेट, चीन, जापान, कोरिया, श्रीलंका, थायलॅंड, म्यानमार या देशांतील बुद्ध मूर्ती व बुद्ध संस्कृतीचे दर्शन घडणारे दालन असतील. या सर्व देशांतील बुद्ध तत्त्वज्ञान त्यांच्या भाषेतील मराठी आणि इंग्रजी अनुवाद असलेले साहित्य, त्रिपिटक येथे उपलब्ध असतील. ऑडिओ, व्हिडिओच्या माध्यमाने त्या-त्या देशातील संस्कृती उपासकांना जाणून घेता येणार आहे. भिक्‍खूंच्या उपसंपदेसाठी भव्य सभागृह याच परिसरात तयार केले जाणार आहे. या सर्व प्रकल्पासाठी जवळपास 70 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी जपान, इंग्लंड, थायलॅंड आणि भारताच्या कानाकोपऱ्यातील उपासक उपलब्ध करून देत असल्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळत असल्याचे बोधिपालो महाथेरो यांनी या वेळी सांगितले.

लोकुत्तरात विविध उपक्रम
लोकुत्तरा महाविहारातील पहिल्या टप्प्यात तयार करण्यात आलेल्या विपश्‍यना केंद्रामध्ये उपासक-उपासिकांसाठी विपश्‍यना शिबिर, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, धम्मसंस्कृती शिबिर, श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरासाठी शहर आणि परिसरातूनच नव्हे, तर महाराष्ट्रातून उपासक येथे येत असतात. राज्य शासनाने लोकुत्तरा महाविहाराला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला असून, "क' वर्गातून "ब' वर्ग पर्यटनस्थळात समावेश झाला आहे.

बुद्ध पौर्णिमेस भूमिपूजन
लोकुत्तरा महाविहाराच्या परिसरात भव्यदिव्य 45 फूट ध्यानस्थ तथागत भगवान बुद्धांची मूर्ती उभारण्यात येणार आहे. सध्या मूर्तीचे काम नागपूर येथे सुरू आहे. मूर्तीच्या चौथऱ्याच्या कामाचा शुभारंभ बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुधवारी (ता. दहा) करण्यात येणार आहे.

Web Title: lokuttara mahavihar