बाजरी, मक्‍याच्या कणसांना आले मोड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

अनाळा परिसरातील ज्वारीचे पीकही धोक्‍यात 

अनाळा (जि. उस्मानाबाद) : परंडा तालुक्‍यातील अनाळासह परिसरात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात कांदा, बाजरी, मका पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

 
कांदा मोठ्या प्रमाणात जमिनीतच नासला असून, मका व बाजरीच्या कणसांना मोड आले आहेत. या पिकांचे पंचनामे कृषी विभागाचे कृषी सहायक बंडू कोकाटे करीत आहेत. गत दोन वर्षांपासून दुष्काळात होरपळणारा शेतकरी यंदा पिकायोग्य पाऊस झाल्याने समाधानी होता. परंतु सलग पावसाने पुरता घायाळ झाला आहे. रब्बीची पेरणी मोठ्या जोमाने शेतकऱ्यांनी केली होती. ज्वारीचे पीकही चांगले आले होते; परंतु सततच्या पावसाने ज्वारीचे पीक पिवळे पडू लागल्याने व त्यावर खोडवा अळ्यांचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने पीक जळू लागले आहे. शेतकऱ्यांनी उसनवारी करून पैसे घेऊन पेरणी केली होती; परंतु आता घेतलेले पैसे कशाने द्यायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकर द्यावी, अशी मागणी होत आहे. 

 

परिसरात परतीच्या पावसामुळे मका, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाल्याने झालेला खर्चही निघणार नसल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाने लवकरात लवकर पीकविमा किंवा हेक्‍टरी मदत करावी. 
- सुभाष गोडसे, अनाळा (ता. परंडा) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of crops due to rainfall