पिकविमा भरण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री

सयाजी शेळके
गुरुवार, 12 जुलै 2018

उस्मानाबाद : पिकविमा भरण्यापूर्वीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खिशाला कोट्यावधी रुपयांची कात्री लागणार आहे. त्यातही सर्वांचा पिकविमा भरला जाणार का, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ऑनलाइन प्रक्रियेने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाला सामोरे जावे लागण्याचे संकेत मिळत आहेत. 

उस्मानाबाद : पिकविमा भरण्यापूर्वीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खिशाला कोट्यावधी रुपयांची कात्री लागणार आहे. त्यातही सर्वांचा पिकविमा भरला जाणार का, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ऑनलाइन प्रक्रियेने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाला सामोरे जावे लागण्याचे संकेत मिळत आहेत. 

यंदाच्या वर्षात केवळ ऑनलाइन पद्धतीनेच पिकविमा भरण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा बँकेनेही यामध्ये हात झटकले आहेत. केवळ कर्जदार शेतकऱ्यांचाच विमा भरणार असल्याचे जाहीर केले आहे. तशा सूचनाही शाखास्तरावर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. आर्थिक फटका सहन करूनच यंदा पिकविमा भरावा लागणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी तीन लाख शेतकरी पिकविमा भरतात. जिल्हा बँकेकडे कर्ज घेणाऱ्यांची संख्या ९२ हजार एवढी आहे. त्यामुळे जिल्हा बँक यंदा केवळ ९२ हजार शेतकऱ्यांचाच विमा भरून घेणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना खासगी केंद्रावर जाऊन पिकविमा भरावा लागणार आहे. एका शेतकऱ्याला पिकविमा भरण्यासाठी किमान १०० रुपये आकारले जातात. जिल्ह्यात सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना खासगी केंद्रावर जाऊन पिकविमा भरावा लागणार आहे. दोन लाख शेतकरी ग्राह्य धरले तरी १०० रुपयांप्रमाणे सुमारे दोन कोटी रुपये पिकविमा भरण्यापूर्वीच शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत.

यंदाच्या ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खिशाला ही कात्री लागणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत जिल्हा बँक सर्वच शेतकऱ्यांचा विमा स्वीकारत होती. आता बँकांनाही ऑनलाइन पद्धतीनेच विमा स्वीकारण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. एका शेतकऱ्याचा विमा भरण्यासाठी किमान १० ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यातही इंटरनेट सुविधा सुरळीत सुरू झाली तर विमा भरण्याची प्रक्रिया लवकर होऊ शकते. त्यामुळे पिकविमा ही शेतकऱ्यांसाठी कटकट ठरण्याचे संकेत मिळत आहेत. 

इंटरनेट सेवा डोकेदुखी करणार? 
यापूर्वी कागदपत्रे देऊन पैसे भरल्यानंतर विमा भरण्याची प्रक्रिया बँकेच्या शाखेत पूर्ण होत असे. आता मात्र कागदपत्रे अपलोड करून तुमचा फॉर्म सबमिट झाल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यासाठी इटरनेट सुविधा अखंडीत सुरू राहणे अपेक्षित असते. दरम्यान नव्या प्रकारामुळे बँक व्यवस्थापनासह शेतकरीही हवालदिल झाले असून, इंटरनेट सुविधा कशी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: loss to farmers before crop insurance