उमरग्यात पावसामुळे शेतीचे नुकसान

umarga
umarga

उमरगा : उमरगा शहरासह परिसरात बुधवारी (ता. 3) रात्री दमदार पाऊस झाला आहे. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे, काढणी केलेल्या आणि शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उमरगा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, 81 मिलीमीटर पाऊस झाला. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने ऊसाचे पिक आडवे झाले आहे. आष्टा (जहागीर) येथे वीज पडून एक म्हैस दगावली.
यंदा प्रारंभीच्या काळात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस उमरगा तालुक्यात झाल्याने खरीप हंगामातील पिकांची स्थिती बरी होती. त्यानंतर तब्बल दीड महिना पाऊस गायब झाल्याने मूग, उडदाची पीके वाया गेली. कालांतराने पावसाने सुरवात केली असली तरी सोयाबीनला त्याचा फायदा होऊ शकला नाही. ऐन फळधारणेत पाऊस नसल्याने शेंगा भरल्या नाहीत. आहे त्या स्थितीतील सोयाबीन पिकाच्या काढणीचे काम सुरू असताना परतीच्या पावसाचा दगाफटका सहन करावा लागतो आहे. मात्र हा पाऊस पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी पूरक ठरत आहे. 

उमरगा शहर व तालुक्यात सर्वदूर सारखा पाऊस झाला नाही. उमरगा महसूल मंडळात सर्वाधिक 81 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे परिसतील नदी, नाल्यांना काही प्रमाणात पाणी आले आहे. कोरेगांव तलावातील पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. दरम्यान सात जुनच्या मध्यरात्री उमरगा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती. 22 जून व  आठ सप्टेंबरलाही अतिवृष्टी झाली. आता पुन्हा चौथ्यांदा बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली आहे.

बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास हलका पाऊस सुरू झाला. त्यांनतर दहाच्या सुमारास पुन्हा पाऊस सुरू झाला. पावणेअकराच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्यात वाऱ्याची गती अधिक होती. त्यामुळे परिपक्व झालेला ऊस वाऱ्याच्या एका झटक्यात आडवा पडला. उमरगा, तुरोरी, दाबका, माडज, गुंजोटी, एकोंडी (जहागीर), एकुरगा, चिंचोली (जहागीर), बेडगा, गुरुवाडी, कोरेगाव आदी गावातील ऊस आडवा पडला आहे. वाऱ्याचा फटका केळीच्या बागेलाही बसला आहे. 

विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याने उमरगा शहरासह मुरुम, आलूर, गुंजोटी आदी गावांत वीजवाहिन्यांच्या तारा तुटल्याने बुधवारी रात्री अकराला गायब झालेली वीज गुरुवारी ( ता. 4) दुपारी साडेबारापर्यंत आली नव्हती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरु केले होते. दरम्यान आष्टा जहागीर येथील काशीनाथ गायकवाड यांची म्हशी वीज पडल्याने दगावली.
तालुक्यात आत्तापर्यंत 674 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. बुधवारी रात्री झालेला महसूल मंडळनिहाय पाऊस, कंसात आतापर्यंत झालेला पाऊस : उमरगा - 81 (736), मुरूम - 21 (579), दाळींब- 24 (703), मुळज - 06 (614), नारंगवाडी - 03 (595 मिलीमीटर).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com