‘स्माईल प्लीज’ची स्माईल हरवली

children-with-a-camera-vector-949577.jpg
children-with-a-camera-vector-949577.jpg


नवीन नांदेड ः साधारणत: जानेवारी संपल्यानंतर फेब्रुवारी ते मे हे चार महिने फोटोग्राफीला सुगीचे दिवस असतात. आधीच अत्याधुनिक मोबाइलच्या कॅमेरेमुळे संकटात आलेल्या व्यावसायिक छायाचित्रकारांचे या वर्षी पूर्ण लग्नसराई हातातून जात असल्याची चिन्हे दिसत असून एप्रिल तर गेलाच, पण आता मे महिनाही हाताला लागतो की नाही याची साशंकता आहे. दुसऱ्यांना ‘स्माइल प्लीज’ म्हणत छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपणाऱ्या छायाचित्रकारांचे लॉकडाउनमुळे वर्ष वाया जात असून यामुळे छायाचित्रकारांची स्माईल मात्र हरवली आहे.


आर्थिक संकटाला सामोरे जावावे लागणार 
जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे ही साखळी तोडण्यासाठी देशभर लॉकडाउन झाल्याने इतर व्यावसायिकांप्रमाणे फोटोग्राफर व व्हिडिओ शुटिंग करणाऱ्यांनाही फटका बसला असून यंदाची लग्नसराई पूर्णतः वाया जाणार आहे. माणसाचे आरोग्य जरी महत्त्वाचे असले तरी याच कालावधीत फोटोग्राफीला मोठ्या सुगीचे आणि मागणीचे दिवस असतात, तर अनेकांची वर्षभराची कमाई याच दिवसांत होत असते. परंतु, मार्च गेला, एप्रिलही गेला, त्याच बरोबर आता मे महिनाही जाण्याची भीती असून त्यामुळे फोटोग्राफी करणाऱ्यांना मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावावे लागणार आहे.

लाखो रुपयांची गुंतवणूक
तीन महीने आधी छायाचित्रकारांचे लग्नाच्या फोटो आणि शुटिंगच्या तारखा बूक झाल्या होत्या. परंतु, पुढे लग्न होतील का? ऑर्डर मिळतील का? असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत. मार्च महिन्यात थोडेफार लग्न झालेत, परंतु (ता.१६) मार्चच्या पुढे सर्व कार्यक्रम बंद झाले आहेत. अगदी तीस हजारांपासून ते तीन लाखांपर्यंत अनेक ऑर्डर छायाचित्रकार घेत असतात. त्यासाठी अनेकजण दरवर्षी अत्याधुनिक कॅमेरे, फ्लॅश, संगणक सॉफ्टवेअर खरेदी करत असतात. हे साहित्य खरेदी करीत असताना त्यात लाखो रुपयांची गुंतवणूक केलेली असते. परंतु, आता याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.

मोबाइल तंत्रज्ञानमुळे आधीच नुकसान
बदलत्या काळात मोबाइल तंत्रज्ञानमुळे मोबाइलच्या कॅमेऱ्याने मोठ्या प्रमाणात आपली छाप उमटविली आहे. अत्याधुनिक आणि महागड्या मोबाइलमुळे छायाचित्रण क्षेत्रात डिजिटल कॅमेऱ्यांचे विश्व मोठ्या प्रमाणात मागे पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्याने मोबाइलमधून समोरच्या दृश्याबरोबर स्वतःचे छायाचित्र काढण्याचा तंत्रज्ञानामुळे मोबाइल कॅमेरा वापरून सर्रास फोटो काढल्या जाऊ लागली आहेत. त्यामुळे वाढदिवस, बारसे, पूजा, वास्तू अशा विविध कार्यक्रमांत मोबाइलमध्ये छायाचित्र काढण्यात येतात. त्यामुळे छायाचित्रकारांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. लग्नातही मोठ्या प्रमाणात फोटो काढल्या जातात. परंतु, त्या फोटोंचा दर्जा राहात नाही. त्यामुळे लग्नाच्या बाबतीत तरी छायाचित्रकारांना चांगले दिवस आहेत.


मार्च, एप्रिलव मे हेच महिने लग्नाचे असतात. एकही लग्न नसल्याने या वर्षीचे पूर्ण लग्नाचे सिजन वाया गेले आहे. सध्या हातात एकही ऑर्डर नाही. मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
- अक्षय कांबळे, व्यावसायिक, छायाचित्रकार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com