दोन कोटींच्या हव्यासापोटी महिलेने गमावले एक कोटी ६३ लाख!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

फसवणुकीबाबत तक्रार
आपणास यूकेमध्ये लॉटरी लागल्याचे आमिष भामट्याने दाखविले. त्यात आपली फसवणूक झाली. अशी तक्रार त्यांनी बॅंक अधिकाऱ्यांकडे दिली. त्यादरम्यान, गैरव्यवहाराबाबत चौकशीही सुरू होती. चौकशीत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बॅंकेतर्फे व्यवस्थापक शंकर यांनी बुधवारी (ता.तीन) तक्रार दिली. त्यानुसार उगलेंविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

औरंगाबाद - यूकेमधील दोन कोटींची लॉटरी लागल्याचा ई-मेल येताच कॅनरा बॅंकेतील एक खिडकी परिचालक महिलेने आपल्याजवळील पैसे संपल्यावर थेट बॅंकेचाच पैसा आरटीजीएस व एनएएफटीद्वारे नायजेरियन भामट्यांना पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. महिलेने बॅंकेला चुना लावत या भामट्यांना एक कोटी ६३ लाख रुपये दिले. महिला कर्मचाऱ्याने फसवणूक झाल्याचे बॅंक व्यवस्थापकांना सांगताच त्यांनी खात्यांची तपासणी केली, तेव्हा हे पितळ उघडे पडले. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अंजली प्रकाश उगले (रा. सिडको) या शहागंज भागातील कॅनरा बॅंकेत गेल्या चार ते पाच वर्षांपासून एक खिडकी परिचालक म्हणून काम करतात. त्यांना जानेवारी २०१९ नायजेरियन भामट्याने यूकेची दोन कोटींची लॉटरी लागल्याचा ई-मेल पाठवला. ही रक्कम दिल्लीच्या विमानतळावर कस्टम ड्युटीमुळे अडकल्याची थाप मारली. या आमिषाला उगले बळी पडल्याचे लक्षात येताच भामट्याचे चांगलेच फावले. दोन कोटींच्या रक्कम देशात आणण्याच्या बदल्यात केंद्र शासनाचे शुल्क आकारणी म्हणून एक ते दीड लाखांची उगले यांच्याकडे मागणी केली. विश्‍वास ठेवून त्यांनीही भामट्याने सांगितलेल्या खात्यात दीड लाखांच्या आसपास रक्कम हस्तांतरित केली. 

यानंतर भामट्याने विविध थापा मारल्या व पैशांची मागणी सुरूच ठेवली. उगले यांनीही रकमेची पूर्तता केली, तेव्हा आपल्या खात्यातील रक्कम संपल्याचे त्यांना लक्षात आले. भामट्यांची मागणी सुरूच असल्याने व दोन कोटींच्या आमिषातून त्यांनी नंतर चक्क बॅंकेतील रक्कमच भामट्यांना ऑनलाइन पाठवायला सुरवात केली. लेजर अकाउंटचा कोड वापरत उगले यांनी २१ जानेवारी ते पाच फेब्रुवारीदरम्यान कॅनरा बॅंकेतील एक कोटी ६२ लाख ९९ हजार दहा रुपये भामट्यांच्या विविध खात्यांत जमा केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lottery Cheating Crime Women