प्रेमी जोडप्यास विवाह नोंदणी कार्यालयाच्या परिसरात मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

औरंगाबाद - नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी आलेल्या प्रियकर-प्रियसीला टोळक्‍याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता.16) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडली. यामुळे काहीकाळ येथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

औरंगाबाद - नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी आलेल्या प्रियकर-प्रियसीला टोळक्‍याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता.16) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडली. यामुळे काहीकाळ येथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की वाळूज एमआयडीसी भागातील साजापूर भागात परराज्यातील एक कुटुंब उदरनिर्वाहासाठी वर्षभरापूर्वी राहायला आलेले आहे. त्यांच्या मुलीचे येथील एका मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू झाले. हे प्रेम प्रकरण विवाहापर्यंत आले. गेल्या काही दिवसांपासून मुलगी मुलासोबत राहू लागली. मुलीच्या नातेवाइकांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात बेपत्ताची नोंदही केली होती.

मंगळवारी (ता. 16) प्रियकराने आपल्या प्रियेसीला सोबत घेत नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. नोंदणीसाठी त्यांनी बॉण्डपेपर मागवला असता दुकानदाराने त्यांना नावे विचारली. ती नावे ऐकून बॉंड न देता त्यांना हाकलून लावण्यात आले. हा प्रकार एका टोळक्‍याला कळताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. यावेळी प्रियकराला मारहाणही करण्यात आली.

याप्रकारानंतर काही काळ येथे तणाव निर्माण झाल्याचे समजताच सिटी चौक ठाण्याचे दुय्यम निरीक्षक संभाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना ठाण्यात आणून त्यांची विचारपूस केली असता प्रेयसी बेपत्ता असल्याची एमआयडीसी वाळूज ठाण्यात नोंद असल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीस वाळूज एमआयडीसी पोलिसांकडे देण्यात आले. मुलीस पोलिसांनी तिच्या नातेवाईकाकडे पाठविले असून मुलासही आपल्या घरी पाठविले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lovers assault at Aurangabad