लातूरच्या पाण्यासाठी प्रसंगी निम्न तेरणाचाही आधार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

किल्लारी अन्‌ मातोळा प्रादेशिक योजनेतील पाण्यासाठी चाचपणी 

लातूर : येत्या काळात पुरेसा पाऊस न पडल्यास शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासह अन्य पर्यायांचाही विचार जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. यातूनच माकणी (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील निम्न तेरणा प्रकल्पातून आलेल्या औसा तालुक्‍यातील किल्लारी व मातोळा प्रादेशिक योजनेतून पाणी घेण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. दोन्ही योजनांतून टॅंकरने दररोज 70 लाख लिटर पाणी शहराला उपलब्ध होण्याची आशा आहे. 

पुरेसा पाऊस न पडल्यास एक ऑक्‍टोबरपासून शहरात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा विचार आहे. यात मांजरा धरणातील तीन दशलक्ष घनमीटर पाणी टॅंकरने पुरवठ्यासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. राखून ठेवलेल्या पाण्यातून दररोज एक कोटी लिटर पाण्याचा उपसा करून ते टॅंकरने पुरवठ्याचे नियोजन आहे. एक कोटी लिटर पाणी जलशुद्धीकरणानंतर शहरातील पाच जलकुंभांवर आणले जाणार असून, तेथून छोट्या टॅंकरद्वारे शहरात वितरित केले जाणार आहे.

टॅंकरने पुरवठा केल्यास मांजरा धरणातील पाणी शहरातील तीन महिने पाणी पुरण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत डिसेंबरअखेर उस्मानाबादच्या विस्तारित पाणी योजनेचे काम पूर्ण होऊन या योजनेतून दररोज रेल्वेने पाणी उपलब्ध होण्याची आशा आहे. यासोबत निम्न तेरणा प्रकल्पातून असलेल्या किल्लारी व मातोळा पाणीयोजनेचाही आधार घेण्यात येणार आहे. या योजनेतून टॅंकरने दररोज 70 लाख लिटर पाणी उपलब्ध होण्याची आशा प्रशासनाला आहे. 

बोअरचे पाणी कमी होऊ लागले 
टंचाईच्या काळात शहरातील विंधनिविहिरींचा (बोअर) मोठा आधार मिळणार आहे. विंधनविहिरींतून दररोज वीस ते तीस लाख लिटर पाणी उपलब्ध होण्याची आशा प्रशासनाला आहे. शहरात महापालिकेच्या एक हजार 464 विंधनविहिरी असून त्यापैकी 83 कोरड्या असून एक हजार 28 विहिरींवर विद्युतपंप, तर 353 विहिरींवर हातपंप आहेत. विद्युतपंपापैकी 861 सुरू असून 167 पाणी नसल्याने बंद आहेत. हातपंपापैकी 89 चालू व 264 बंद आहेत. पाणी चालू असलेल्या 861 पैकी 646 विंधनविहिरींचे पाणी भूजलाची पातळी खोल गेल्याने कमी झाले असून 215 विद्युतपंपांचे पाणी सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lower Terna also in consideration for water in latur