उस्मानाबादच्या युवकाने तयार केले निर्जंतुकीकरणाचे मशीन

सयाजी शेळके
शुक्रवार, 29 मे 2020

उस्मानाबाद शहरातील अनिकेत काळे या युवकाने निर्जंतुकीकरणाचे मशीन तयार केले आहे. अगदी साध्या पद्धतीचे हे मशीन असून एक व्यक्ती अगदी अलगदपणे हाताळू शकते. 

उस्मानाबाद : कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. देशासह राष्ट्रीय पातळीवर संशोधन सुरू आहे. मुंबई आयआयटीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अनिकेत काळे याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी निर्जंतुकीकरण करण्याचे मशीन विकसित केले आहे. अगदी माफक दरामध्ये आणि साध्या पद्धतीमध्ये हे मशीन असून त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोरोनाचा फैलाव एकापासून दुसऱ्याकडे अगदी झपाट्याने होतो. त्यामुळे त्याचा फैलावही राज्यासह देश आणि जगात मोठ्याने वाढत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्स असे विविध प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, कोरोनाचा फैलाव अगदी कोणत्याही वस्तूद्वारे होऊ शकतो.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

बाजारातून फळे, पालेभाज्या विकत आणल्या तरीही त्यावर असलेला कोरोना विषाणू घेणाऱ्याच्या घरात येऊ शकतो. मोबाईल, पेन, पैसे अशा प्रकारच्या वस्तू घराबाहेर घेऊन पुन्हा घरात आणल्या तर तेथूनही कोरोनाची लागण होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यासाठी अशा वस्तूंना निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. मुंबई आयआयटीमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या आणि मूळ उस्मानाबाद शहरातील अनिकेत नितीन काळेने निर्जंतुकीकरणाचे मशीन तयार केले आहे. अगदी साध्या पद्धतीचे हे मशीन असून एक व्यक्ती अगदी अलगदपणे हाताळू शकते. शिवाय सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येते. या मशीनला फारशी जागाही लागत नाही. 
 
असे चालते मशीन 
यामध्ये यूव्ही (अल्ट्रा व्हायलेट) लाइट असतो. तो २५० ते २६० नॅनोमीटरचा असतो. त्याद्वारे विषाणूचा डीएनए प्रोटीन चेंज करतो. त्यामुळे तो विषाणू पुढे वाढत नाही, नष्ट होऊन जातो. त्यानंतर त्यामधील सर्व वस्तू, फळे, भाजीपाला खाण्यासाठी उपयुक्त ठरतात. अगदी या वस्तू केवळ चार ते पाच मिनिटांसाठी ठेवल्यानंतरही त्या निर्जंतुक होऊन जातात. 

हेही वाचा चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ  

कसे आहे मशीन 
एक लोखंडी बॉक्स आहे. त्यामध्ये यूव्ही ट्युब असते. ट्युबसोबत त्याला चोक जोडला आहे. हे सर्व एका सर्किटने जोडले आहे. जेव्हा विजेचे बटन दाबतो तेव्हा त्या ट्युबमधून ठराविक व्हेवलेंथचा लाइट निघतो. तो आत ठेवलेल्या वस्तूवर पडतो. त्यामध्ये विषाणू नष्ट होतात. पुन्हा त्या वस्तू आपण वापरू शकतो. म्हणजेच त्या वस्तू निर्जंतुक झालेल्या असतात. 

कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर मी याबाबत विचार करीत होतो. बाजारात पाच ते १० लिटरचे असे युनिट १० ते १५ हजार रुपयांना विकत मिळते. मात्र मी तयार केलेले मशीन जेमतेत चार ते पाच हजार रुपयांमध्ये तयार होते. विशेष म्हणजे ते १५ ते २० लिटरचे आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आवाक्यातील हे मशीन असून सध्या अनेक ठिकाणांहून मागणी येत आहे. 
- अनिकेत नितीन काळे, उस्मानाबाद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: machine made by a youth from Osmanabad