वाळू माफियांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसह चौघांना कोंडले ; पाऊण कोटींचा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

तालुक्यातील कुर्ला, औरंगपूर गावांजवळून सिंदफणा नदी जाते. तेथून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावर शनिवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी विकास माने, खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, मंडळ अधिकारी पी. के. राख, तलाठी आसाराम शेळके हे चौघे वाळू घाटांच्या पाहणीसाठी औरंगपूरला पोचले. 

बीड : विटभट्टीतील अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करण्यास गेलेले उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह चार अधिकाऱ्यांना कोंडून वाहनांसह तिघे फरार झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) तालुक्यातील औरंगपूर येथे घडली. पोलिसांच्या मदतीने महसूल अधिकाऱ्यांनी पाऊण कोटींचा वाळू साठा जप्त केला. 

तालुक्यातील कुर्ला, औरंगपूर गावांजवळून सिंदफणा नदी जाते. तेथून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावर शनिवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी विकास माने, खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, मंडळ अधिकारी पी. के. राख, तलाठी आसाराम शेळके हे चौघे वाळू घाटांच्या पाहणीसाठी औरंगपूरला पोचले. 

औरंगपूरजवळील यशराज विटभट्टी कारखान्यात त्यांना वाळूचा मोठा साठा आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी वाळूच्या रॉयल्टीच्या पावत्या मागितल्या. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तिघांनी पावत्या नसल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी कारवाईची भूमिका घेताच अनिल पांडुरंग पाटील (रा. कुर्ला) याने आपल्या सहकाऱ्यांना विटभट्टीचे प्रवेशद्वार बंद करायला लावले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी वाळूचे मोजमाप करण्यासाठी सहायक अभियंता व्ही. टी. डहाळे यांना बोलावून घेतले. तब्बल पाऊण कोटी रुपयांचा ३१४ ब्रास वाळूचा साठा आढळून आला. अधिकारी पंचनामा करुन वाळू जप्त करण्याच्या तयारीत असताना तिघांनीही अधिकाऱ्यंशी दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केली.

त्यानंतर अधिकाऱ्यांना विटभट्टीत कोंडून वाळू उपसा करण्यासाठी तेथे उभे केलेला १५ लाखांचा जेसीबी (क्रमांक एमएच २३ बी- ८१११), आठ लाख किंमतीचा टिप्पर (क्रमांक एमएच २३ डब्ल्यू- २९०९) व सहा लाख किंमतीची विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर अशी तीन वाहने घेऊन पोबारा केला. यावेळी उपविभागीय अधिकारी माने यांनी बीड ग्रामीण पोलिसांना पाचारण केले. मात्र, तोपर्यंत तिन्ही आरोपी पळून गेले. फौजदार बालाजी ढगारे, पो़ना़ रमेश दुबाले, कैलास ठोंबरे, मनोहर भुतेकर व चालक शेख खय्यूम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, कारवाईस सहा तासांचा वेळ लागला. उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी स्वत: फिर्याद दिली. त्यावरुन अनिल पांडुरंग पाटील, रघुजी गोवर्धन पाटील (दोघे रा. कुर्ला, ता. बीड) व सुजित शामसुंदर पडुळे (रा. औरंगपूर) यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून तिघेही फरार आहेत.

Web Title: Mafia gets Misbehaviour with subdivisional officers huge Amount of rupees were seized