नाटकांच्या माध्यमातून दुःख निवारण व्हावे - महादेव जानकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

उस्मानाबाद - नाटक हे दृश्‍य माध्यम असून ते रसिकांशी संवाद साधते. या माध्यमातून सर्वसामान्यांचे दुःख निवारण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा दुग्धविकास, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली. 

उस्मानाबाद - नाटक हे दृश्‍य माध्यम असून ते रसिकांशी संवाद साधते. या माध्यमातून सर्वसामान्यांचे दुःख निवारण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा दुग्धविकास, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली. 

येथील तुळजाभवानी स्टेडियममधील सुलभा देशपांडे नाट्यनगरीत 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 21) श्री. जानकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलत होते. संमेलनाचे मावळते अध्यक्ष गंगाराम गवाणकर, विद्यमान अध्यक्ष जयंत सावरकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सतीश लोटके, स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. जानकर म्हणाले, मराठी नाट्यचळवळ टिकावी, दिवसेंदिवस ती वृद्धिंगत व्हावी, यासाठी रंगकर्मी प्रयत्नशील आहेत. नाट्यसंमेलनासाठी वाढीव निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांकडे पाठपुरावा करू. 

कोल्हापूर, नागपूर, जळगाव व उस्मानाबाद येथून नाट्यसंमेलनाचे प्रस्ताव होते. त्यापैकी कोल्हापूर, जळगावने माघार घेतली. त्यानंतर उस्मानाबादेत संमेलन घेण्याचे निश्‍चित केले. यासाठीचा येथील उत्साह अवर्णनीय होता. तो पाहता नाट्यसंमेलन उस्मानाबादला घेतल्याचा पश्‍चात्ताप होत नसल्याचे श्री. जोशी म्हणाले. 2003 मध्ये कराड येथील संमेलनावेळी दहा लाखांचा निधी होता. त्यावेळी महागाई होती. निधी वाढवून देण्याची मागणी केल्यानंतर तो 25 लाख करण्यात आला. आता महागाई आणखी वाढली, खर्चही वाढला आहे. याचा मंत्र्यांनी विचार करून निधी वाढवून द्यावा. अन्यथा संमेलने करणे अवघड होईल. रंगकर्मींना घरे देण्याचाही विचार व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

श्री. गवाणकर म्हणाले, उस्मानाबादला नाट्यसंमेलन घेण्याबाबत काही जणांचा नकारात्मक सूर होता. परंतु येथील उत्साह, नेटके नियोजन पाहिल्यानंतर हा एक राज्याभिषेक सोहळा असल्यासारखे वाटते. श्री. करंजीकर यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष आमदार ठाकूर यांचे स्वागतपर भाषण झाले. अभिनेते अतुल परचुरे, मैथिली जावकर यांनी सूत्रसंचालन केले. 

स्थानिकांचा सत्कार 
जिल्ह्यातील नाट्यचळवळीत योगदान दिलेल्या शिवराम वट्टे (बारूळ), विजय भोसले (सरकार, तुळजापूर), वाल्मीक थोरात (देवधानोरा), श्रीकांत नाडापुडे (तुळजापूर), पवन वैद्य यांचा आणि संमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव यांचा सत्कार करण्यात आला. उद्‌घाटन सोहळ्याला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. 

जगण्याइतपत पेन्शन द्या 
संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर म्हणाले, कलावंतांना दिवसाला 70 रुपये पेन्शन आहे. कलावंतांना जगण्याइतपत सरकारने पेन्शन द्यावे, हा नियम आहे. त्याला अनुसरून पेन्शनमध्ये वाढ करावी आणि ते कलावंतांच्या खिशापर्यंत कसे पोचेल, याकडे लक्ष द्यावे. राज्यातील अनेक नाट्यगृहांची दुरवस्था झाली आहे. सरकारने सर्व नाट्यगृहे नाट्य परिषदेच्या ताब्यात देऊन देखभालीसाठी तेथे पगारी माणसे नेमावीत. नाट्यगृहे ही कमाईचे साधन न मानता ती नाट्यप्रयोगासाठीच ठेवावीत. जेणेकरून नाट्यगृहांची अवस्था सुधारावी. 

Web Title: Mahadev jankar in osmanabad