'कोट्यवधी निधी मिळूनही कॉंग्रेसकडून विकास नाही'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नांदेड - गुरूता गद्दी सोहळ्याच्या निमित्ताने कोट्यवधींचा निधी मिळूनही कॉंग्रेसने विकास का केला नाही. अशोक चव्हाण यांनी मुंबईत फ्लॅट घेतले आणि दुसरीकडे नांदेडमधील पन्नास हजार कुटुंबांना अजूनही हक्काचे घरे नाहीत. मग कॉंग्रेसचे नाते विकासाशी कसे?,'' असा प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला. 

नांदेड - गुरूता गद्दी सोहळ्याच्या निमित्ताने कोट्यवधींचा निधी मिळूनही कॉंग्रेसने विकास का केला नाही. अशोक चव्हाण यांनी मुंबईत फ्लॅट घेतले आणि दुसरीकडे नांदेडमधील पन्नास हजार कुटुंबांना अजूनही हक्काचे घरे नाहीत. मग कॉंग्रेसचे नाते विकासाशी कसे?,'' असा प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला. 

नांदेड महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नवा मोंढा येथे झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. ते म्हणाले ""गुरुता गद्दी सोहळ्यानिमित्त झालेल्या विकासकामांच्या अहवालात अनेक गोष्टी नमूद आहेत. मी जगातील अनेक देशांत जाऊन नदी आणि नदी घाट विकासाची कामे पाहिली; पण कुठेही मला नदीच्या काठावर ग्रेनाईट फरशी दिसली नाही. नांदेडला गोदावरी घाटावर ग्रेनाईट फरशी लावली आहे. जवळपास 70 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाला आहे. ईश्वराच्या कामांतही गैरव्यवहार होतो, ही बाबच चुकीची आहे.'' 

""शहरांचा चांगल्या पद्धतीने विकास होण्यासाठीच "स्मार्ट सिटी', "अमृत' योजना आखली आहे. त्याशिवाय चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारच्या कामात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सेवेचा अधिकार, ई-गर्व्हनन्सच्या माध्यमातून 387 ऑनलाइन सेवा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,'' अशी माहिती त्यांनी दिली. 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री सूर्यकांता पाटील आदींची भाषणे झाली. 

शिवसेनेला लढायचेच नाही 
शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत फार काही बोलण्याची आवश्‍यकता नाही. शिवसेनेला खरे तर लढायचेच नाही. ते कॉंग्रेससोबत असून अशोक चव्हाण यांची "बी टीम' ही शिवसेना झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. भाजपला पराभूत करण्यासाठीच शिवसेना मैदानात उतरली असली तरी आम्हीच बाजी मारू, असा विश्‍वास त्यांनी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Web Title: maharashtra news congress