संघ परिवार सोडून सर्वच असुरक्षित - गुलाम नबी आझाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - ""देशात स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर एक वेगळीच लोकशाही अवतरली आहे. देशात माध्यमे सर्वांत अधिक असुरक्षित आहेत, त्यानंतर दलित, गोरगरीब, नंतर महिला आणि शेतकरीसुद्धा असुरक्षित आहेत. भाजप सरकार संघाचा अजेंडा राबवत असून, टीव्हीवर देखावा करणारे आणि हवेवर चालणारे हे सरकार आहे'', असा आरोप माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला. 

औरंगाबाद - ""देशात स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर एक वेगळीच लोकशाही अवतरली आहे. देशात माध्यमे सर्वांत अधिक असुरक्षित आहेत, त्यानंतर दलित, गोरगरीब, नंतर महिला आणि शेतकरीसुद्धा असुरक्षित आहेत. भाजप सरकार संघाचा अजेंडा राबवत असून, टीव्हीवर देखावा करणारे आणि हवेवर चालणारे हे सरकार आहे'', असा आरोप माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला. 

कॉंग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी आझाद येथे आले असता त्यांनी भाजप सरकारवर निशाना साधला. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्य प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषद उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील आदी उपस्थित होते. 

आझाद म्हणाले, ""देशातील शेतकरी, उद्योजक हतबल आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाने उद्योग अडचणीत सापडले असून, नवीन उद्योग सुरू होत नाहीत. "जीएसटी'मुळे ऑटोमोबाईल, सिमेंट, टेक्‍स्टाईल उद्योग धोक्‍यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती; मात्र साडेतीन वर्षांत साडेतीन लाख लोकांनाही नोकरी मिळाली नाही.'' 

आझाद म्हणाले, ""केंद्र सरकार जुन्याच योजनांना नवीन नावे देऊन उद्‌घाटने करीत आहे. दबावतंत्राचा वापर सुरू आहे. स्पष्ट आणि विरोधी बोलणाऱ्यांवर "ईडी', "सीबीआय'चा वापर करून छापे टाकले जातात. देशात पहिले भाषण पंतप्रधान मोदींचे आणि शेवटचे भाषणही त्यांचेच असा एकछत्री अंमल सुरू आहे,'' असेही आझाद म्हणाले. 

दरम्यान उत्तर प्रदेशातील घटनेवर भाष्य करताना आझाद म्हणाले, ""उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील शासकीय रुग्णालयातील 65 मुलांच्या मृत्यूच्या घटनेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे. योगी आदित्यनाथ यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही.'' 

भ्रष्ट मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ 
राज्य सरकार भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला; मात्र गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश महेता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे राजीनामे फेटाळून लावल्याने मुख्यमंत्र्यांचे दुटप्पी धोरण स्पष्ट झाले. मेहता यांची लोकायुक्तामार्फत चौकशी केली जाणार आहे. महेतांच्या आरोपानुसार संबंधित फाइलशी मुख्यमंत्र्यांचाही संबंध आलेला आहे. लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची चौकशी करू शकत नाही यातच सर्वकाही आले; तर देसाईंचा राजीनामा काढून घेतला; तर शिवसेना सरकारचा पाठिंबा काढू शकते, अशी भीती मुख्यमंत्र्यांना असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. 

Web Title: maharashtra news gulam nabi azad