जुळवून घ्या, शिंदेंना नेता माना; सत्तार यांचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांना सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra politics shiv sena cm eknath shinde abdul sattar uddhav thackeray jalna

जुळवून घ्या, शिंदेंना नेता माना; सत्तार यांचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांना सल्ला

जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून आम्ही निवड केली आहे. त्यामुळे त्यांच्याशी आता जुळवून घ्यावे, शिंदे यांच्या छत्रछायेत एका भगव्याखाली एकत्र यावे, त्यांना नेता मानावे, असा सल्ला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. शिंदे गटातर्फे येथे गुरुवारी हिंदू गर्व गर्जना मेळावा झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सत्तार म्हणाले, अडीच वर्षे ‘मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी’ त्यांनी पार पाडली. याच काळात शिवसैनिकांचे मात्र हाल झाले. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुका भाजप-शिवसेनेने एकत्र मते मागितली. परंतु, नेत्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आणि तीन चाकी सरकार स्थापन केले.

त्यामुळे शिवसेना वाचविण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांना घ्यावी लागली. आता शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेना-भाजपची खरी युती झाली आहे. शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर अल्पावधीतच आठशे शासन निर्णय काढले आहेत. मुख्यमंत्री शिंदे प्रत्येकाला भेटत आहेत. अडीच वर्षांत असे होत नव्हते. आता शिंदे सर्वांना भेटतात हे पाहिल्यावर ‘ते’ही शाखेपर्यंत जात आहेत. मागील अडीच वर्षे ते गावापर्यंत जरी गेले असते तरी ही वेळ आली नसती. आमच्याकडे बहुमत असून शिंदे यांना राष्ट्रीय नेते म्हणून आम्ही निवडले आहे. त्यामुळे शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे, ज्यांना हिंदुत्ववाद पटत असेल त्यांनी एकत्र यावे, शिंदे यांना नेता मानावे, असा सल्ला सत्तार यांनी नाव न घेता ठाकरेंना दिला आहे. पुढची शिवसेना ही धनुष्य बाणासह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहील असेही सत्तार यांना सांगितले.