प्रदीप जैस्वाल का येतात वारंवार निवडून? । Election Results 2019

योगेश पायघन
Thursday, 24 October 2019

संकटात अर्ध्या रात्रीही धावून येणारा आणि पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा अशी ओळख निर्माण केलेल्या प्रदीप जैस्वाल यांना आजही तरुणाईत पसंती पहायला मिळते.

औरंगाबादेत 1986 ते 88 दरम्यान शिवसेनेची पाळेमुळे जोमाने रुजली. मराठवाड्यात, विशेषतः शहरांमध्ये शिवसेना वेगाने वाढली. सर्वसाधारण, तळागाळातील आक्रमक तरुणांना त्यावेळी संधी मिळाली. कोणताही वारसा नसतांना या तळागाळातल्या नवउमेदी तरुणांना नगरसेवक, महापौर, आमदार, खासदारांसह विविध पदांवर विराजमान करण्याचा करिष्मा शिवसेनेने केला. त्यातीलच एक नाव म्हणजे प्रदीप जैस्वाल. गुलमंडीवरच्या मित्रमंडळीतील आक्रमक 'पिया' 1988 ला पहिल्यांदा नगरसेवक झाले. अनेक चढउतार आले. सर्वांत तरुण महापौर, शिवसेनेचा शहरप्रमुख, पुन्हा नगरसेवक, थेट खासदार, आमदार अशी अनेक पदे भूषवतांना साठीतील जैस्वालांच्या मागे पक्ष असो वा नसो तरुणाईची गर्दी आजही कायम दिसते.

संकटात अर्ध्या रात्रीही धावून येणारा आणि पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा अशी ओळख निर्माण केलेल्या प्रदीप जैस्वाल यांना आजही तरुणाईत पसंती पहायला मिळते. शिवसेनेत सुरुवातीच्या काळात जातीपातीच्या राजकारणाची कीड लागलेली नव्हती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कामगार, रिक्षाचालक, बेरोजगार तरुणांसह महाविद्यालयांतील आक्रमक तरुणाईला संधी दिली.

क्लिक करा - असा उडवला एमआयएमचा धुव्वा

1984 ला प्रदिप जैस्वाल श्री गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते शिवजयंती समितीचेही अध्यक्ष बनले. त्यांची 'पिया' या नावाने मित्रमंडळात चांगलीच जादू होती. त्याच काळात ऐंशीच्या दशकात शिवसेना नावाची क्रेझ आली होती. मराठवाड्यातही 1986 सुमारास शिवसेनेची पाळेमुळे रुजायला लागली. त्यात शहरातील गुलमंडी, औरंगपुरा, पदमपुरा, परिसरातील तरुण मंडळी सक्रीय होत होती. 1988च्या नगरपालिकेची निवडणुक जाहीर झाल्यावर मित्रपरिवाराने जैस्वालांना शिवसेनेकडून लढण्याचा आग्रह धरला.

जैस्वाल शिवसेनेकडून लढले अन्‌ नगरसेवक पदी निवडून आले

त्यानंतर एक एक विजय मिळवत खासदारपदापर्यंत मजल मारली. दरम्यान, त्यांनी अनेक संकटांचा सामना केला मात्र, कार्यकर्त्यांना कधी अंतर दिले नाही. संकटात कधी हात वर केले नाहीत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक जण शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहिल्याचे त्यांचे मित्र आर. सी. पटेल 'सकाळ"शी बोलतांना सांगत होते. मित्रांसाठी आजही ते 'पिया'च असल्याने प्रत्येक निवडणूक काळात त्यांचा मित्रपरिवार त्यांच्या अवतीभोवती दृश्य-अदृश्य स्वरुपात साथ द्यायला कायम उभा राहतो, असेही ते म्हणाले.

आशिया खंडातील सर्वात तरुण महापौर

1990 ला प्रदिप जैस्वाल औरंगाबादचे महापौर झाले. अनेक आक्रमक लढे याच काळात झाले. संघर्षाच्या या काळात पक्षासोबत कार्यकर्ते, नागरिकांच्या सोबत उभा राहतांना जैस्वालांचा आक्रमक स्वभाव, सहज उपलब्ध होण्यामुळे त्यांना ही संधी शिवसेनेनं दिली होती. आशिया खंडातील सर्वात तरुण महापौर 
म्हणून त्यांनी अर्जेंटिनाला झालेल्या महापौर परिषदेत शहराचे प्रतिनिधित्व केले. 1992 ला ते शिवसेनेचे शहरप्रमुख झाले. त्या काळात शिवसेनेने पक्षबांधणीवर भर दिला.

शहरातील स्थानिक नेत्यांच्या पहिल्या फळीत ते काम करत होते. 1995ला पुन्हा महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. त्यावेळी स्थायी सभापतीपदाची संधी मिळाली. तर 1996 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना खासदारकीची उमेवारी शिवसेनेकडून मिळाली. त्यावेळी 1 लाख 15 हजारांच्या मताधिक्‍याने विजय झाला.

दरम्यान, त्यांनी केंद्रीय आवास योजना, एचआरडी, नगर विकास अशा समित्यांवर सदस्य म्हणून काम केले. रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष होत त्यांनी कामगार युनियनमध्येही काम केल्याने तळागाळातल्या लोकांत कायम संपर्कात राहिले. 2006 ला त्याच्यावर जिल्हाप्रमुखपदाची धुरा सोपवण्यात आली. त्याच काळात गणेश महासंघाचेही ते अध्यक्ष बनले. मात्र, शिवसेनेकडून मध्य विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष निवडणुक लढवून ते विजयी झाले. त्या काळात सर्वज जाती धर्माच्या विविध संस्था संघटनांनी त्यांना साथ दिल्याने अल्पसंख्यांक समितीवर राज्य शासनाने नियुक्ती केली.

ते शिवसेनेत परतले 

2014 च्या निवडणुकीत युती तुटल्याने भाजपकडून त्यांचेच मित्र किशनचंद तनवाणी यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढली. त्यात झालेल्या मतविभाजनाचा फटका बसल्याने ते हरले. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी दिली. 2019 मध्ये पुन्हा विधानसभेला मध्यतून उमेदवारी दिली. यावेळी पुरान्या दोस्तीचे हवाले आणि आणाभाका झाल्या. किशनचंद तनवाणी यांनी जैस्वालांना साथ दिली. अन्‌ पुन्हा ते आमदारपदी मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Aurangabad final result shivsena Pradeep Jaiswal won