बीडमध्ये पुतणे संदीप क्षीरसागर ठरले जाईंट किलर | Election Results 2019

दत्ता देशमुख
Thursday, 24 October 2019

दोन्ही क्षीरसागरांच्या समर्थकांची धाकधुक चांगलीच वाढली होती. परंतु, अखेर जयदत्त क्षीरसागर यांना मात देण्यात संदीप क्षीरसागर यशस्वी ठरले. 
 

बीड - मातब्बर काका जयदत्त क्षीरसागर यांना मात देत पुतणे संदीप क्षीरसागर बीडचे बाजीगर ठरले आहेत. शेवटच्या फेरीपर्यंत दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढविणाऱ्या या निवडणुकीत आणि मतमोजणीत अखेरच्या क्षणी संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली. बीडचा सस्पेन्स उशिरापर्यंत चालला. 

Image may contain: 2 people, people standing
संदीप क्षीरसागर

मागच्या वेळी राष्ट्रवादीकडून एकमेव विजयी झालेले जयदत्त क्षीरसागर लोकसभा निवडणुकीत आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेले. शिवसेनेने मंत्रीपद आणि त्यांना उमेदवारीही दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर केली होती. जिल्ह्यात बीड हा शिवसेनेचा एकमेव मतदार संघ आहे. क्षीरसागरांपूर्वी येथून तीन वेळा शिवसेनेचा विजय झालेला आहे. खुद्द जयदत्त क्षीरसागर यांनाही शिवसेनेच्या सुरेश नवले यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, काका पुतण्यांतील लढत अगदीच अटीतटीची आणि रंगतदार झाली होती.

संदीप क्षीरसागर यांना निवडणुकांचा अनुभव असला तरी विधानसभेच्या फडात ते प्रथमच उतरले होते. त्यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत दोन्ही काकांना लढत देत नेत्रदिपक कामगिरी केली होती. परंतु, विधानसभेच्या फडात काका जयदत्त क्षीरसागर यांच्यापुढे त्यांची यंत्रणा, अनुभव आणि इतर बाबी कमी पडल्याचे बोलल्या जात होते.

जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे मंत्रीपदासह सर्वच यंत्रणा तगडी होती. दोघांनीही आपापल्या परीने ताकद लावत निवडणुक लढविली.

दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडी घेणारे जयदत्त क्षीरसागर बीड शहराची मोजणी सुरु झाल्यानंतर दहा हजार मतांनी पिछाडीवर गेले. ही आघाडी संदीप क्षीरसागर यांच्यासाठी निर्णायक ठरली. मात्र, त्यानंतर ग्रामीण भागात जयदत्त क्षीरसागर यांना प्रतिसाद भेटल्याने फेरीनिहाय संदीप क्षीरसागरांचे मताधिक्क्य घटत होते. शेवटच्या चार फेऱ्यांत तर साडेचार हजारांचे मताधिक्क्य असलेले संदीप क्षीरसागर हजार मतांनी मागे पडत होते. त्यामुळे दोन्ही क्षीरसागरांच्या समर्थकांची धाकधुक चांगलीच वाढली होती. परंतु, अखेर जयदत्त क्षीरसागर यांना मात देण्यात संदीप क्षीरसागर यशस्वी ठरले. 
 
२६ व्या फेरीत आघाडी

एकदा दहा हजारांचे मताधिक्क्य घेणाऱ्या संदीप क्षीरसागर व जयदत्त क्षीरसागर यांच्यात एकदा तर फक्त ५८ मतांचा फरक होता. १६ व्या फेरीनंतर संदीप क्षीरसागर यांचे मताधिक्क्य घटत होते. परंतु, २६ व्या फेरीत त्यांनी विजयी आघाडी घेतली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Beed result Sandip Kshirsagar won