हिंगोली : कळमनुरीच्या तिरंगी लढतीतून बाण सुटला  

मंगेश शेवाळकर
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या कळमनुरी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आघाडी घेत विजय साकारला.

हिंगोली : शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या कळमनुरी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आघाडी घेत विजय साकारला. कळमनुरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे विजयी उमेदवार संतोष बांगर यांना ८२ हजार ५१५ मते, वंचितचे अजित मगर यांना ६६ हजार १३७, कॉंग्रेसचे डॉ. संतोष टारफे यांना ५७ हजार ५४४ मते मिळाली आहेत.

अधिकाऱ्यांचा समन्वय कौतुकाचा विषय 

हिंगोली, कळमनुरी व वसमत मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्‍यापासून सुरु झाली. कळमनुरीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दोन दिवसापासून मतमोजणीचे नियोजन केले होते. मतमोजणीमध्ये सर्वात जलद गतीने कसा निकाल लावता येईल यासाठी श्री. खेडेकर यांनी मतमोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अॅक्‍शन प्‍लॅन दिला होता. त्‍यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतमोजणीला सुरुवात केली. प्रत्‍येक अधिकारी कर्मचाऱ्याने त्‍यांना दिलेली जबाबदारी योग्‍य रितीने पार पाडत समन्वय देखील ठेवला.

क्लिक करा - या कारणांनी झाला पंकजा मुंडे यांचा पराभव

त्‍यामुळे मराठवाड्यात इतर ठिकाणी पहिल्‍या फेरीचे निकाल हाती येत असताना कळमनुरीत मात्र चौथ्या व पाचव्या फेरीचे निकाल हाती येवू लागले होते. प्रत्‍येक फेरीनंतर उमेदवारनिहाय पडलेल्‍या मतदानाची घोषणा केली जावू लागली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण दोन लाख अकरा हजार मतमोजणी करून अंतिम निकाल जाहिर करण्यात आला.

मराठवाड्यात कळमनुरी विधानसभेचा सर्वप्रथम अंतिम निकाल जाहिर होवून विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र देण्यात आले. सर्वात जलद गतीने मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहिर केल्‍याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांचे निवडणूक निरीक्षकांसह जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, निवडणूक उपजिल्‍हाधिकारी राजू नंदकर, निवासी उपजिल्‍हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्‍यासह अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Kalmnuri final result shivsena won