लातूर : निलंग्यात भाजपला पडली एव्हढी मते | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

दोन्ही निलंगेकरामध्ये वंचित विकास आघाडीच्या मतांचा परीणाम 

लातूर  - राजकीयदृष्या अतिशय संवेदनाशील असलेल्या निलंगा विधानसभा मतदार संघावर तिघाचा अपवाद वगळता कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून आतापर्यंत केवळ "निलंगेकर' घराण्याचेच वर्चस्व राहीले आहे. यावेळीच्या विधानसभा निवडणूकीत भाजपचे संभाजीराव पाटील निलंगेकर 32 हजार 131 मताधिक्‍यांनी विजयी झाले. दोन्ही निलंगेकरामध्ये झालेल्या या लढतीत वंचित विकास आघाडीच्या मतांचा परीणाम दिसून आला. 

निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे संभाजीपाटील निलंगेकर यांना 97 हजार 324, कॉंग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर यांना 65 हजार 193 तर वंचित विकास आघाडीचे अरविंद भातांब्रे यांना 29 हजार 814 मते मिळाली. या तिरंगी लढतीत संभाजी पाटील निलंगेकर यांनी 32 हजार 131 मतांची आघाडी घेतली.

या विधानसभा मतदार संघाचा 1952 ते 2014 च्या निवडणुकीपर्यंतचा आढावा घेतला तर या मतदारसंघाने वेगवेगळे राजकीय अनुभव देण्याबरोबरच 'निलंगेकरांनाच' पसंती दिली असून अस्तित्वाच्या लढाईत कै. शेषराव वाघमारे, कै. श्रीपतराव सोळुंके व कॉ. माणिक जाधव यांचा अपवाद वगळता निलंगेकर कुटुंबीयांचे वर्चस्व या मतदारसंघात दिसून येते. या मतदारसंघात 1952 पासून 2014 पर्यंतची राजकीय परस्थिती पाहता माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रदीर्घ काळ या मतदार संघाचे प्रतिनीधीत्व केले आहे. 

विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर 1952 मध्ये कै. शेषराव वाघमारे हे पहीले कॉंग्रेसचे आमदार झाले. मात्र या मतदार संघात मराठा उमेदवाराशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कॉंग्रेस पक्षाकडून निवडणुक रिंगणात उभे केले तर विरोधी शेतकरी कामगार पक्षाकडून कै. श्रीपतराव सोळूंके या दोघात लढत होऊन 1957 ला शेतकरी कामगार पक्षाचे श्रीपतराव सोळुंके आमदार झाले. त्यानंतर 1962 मध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर कॉंग्रेसचे आमदार झाले. या मतदार संघाचे दुसरे वैशिष्ट्य असे की, आमदार कॉंग्रेसचे असले तर स्थानिक स्वराज्य संस्था या विरोधी पक्षाच्या ताब्यात असायच्या त्यानंतर 1985 साली पोटनिवडणूक झाली त्यामध्ये कै. दिलीप पाटील निलंगेकर हे आमदार झाले.

1995 मध्ये कॉ. माणिक जाधव जनता दल व आघाडीकडून निवडून आले. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बंडखोरी करून तालुक्‍यात ग्रामीण विकास आघाडीची स्थापना केली पहिल्याप्रथम पंचायत समिती विजय मिळवला. त्यानंतर सन 2004 संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून युतीत शिवसेनेकडे असलेला मतदार संघ भाजपाला घेतला व ते भाजपाकडून आमदार झाले. सन 2009 च्या निवडणुकीत पुन्हा डॉ. निलंगेकर विजयी झाले. 

सन 2014 ला अशोकराव पाटील निलंगेकर (कॉंग्रेस) व संभाजीराव पाटील निलंगेकर (भाजपा) या काका पुतण्यात निवडणूक होऊन संभाजीरावाची सरशी झाली. विधानसभा अस्तित्वात आल्यापासूनचा राजकीय परस्थिती पाहता येथील राजकारणात 1952 पासून 1995 पर्यंत या निवडणुकांत कॉंग्रेसला मतदारांनी पसंती दिली 1995 ला मात्र डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कामगिरीला कंटाळूनमतदारांनी परिवर्तन करून कॉ. माणिक जाधव यांना विजयी केले.1995 च्या विधानसभा निवडणुकीत चा अपवाद वगळता निलंगा विधानसभा मतदारसंघ "निलंगेकर' घराण्याचे वर्चस्व राहिले असून डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाच दशक या मतदार संघाचे नेतृत्व केले असून राज्यात जवळपास तीस वर्ष मंत्री म्हणून काम करण्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. निलंगेकर घाराण्याच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्व संभाजी पाटील निलंगेकर यांनी नेतृत्व करीत आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून म्हणून मान मिळाला. 

अपक्षांची आकडेवारी ः 

  • राजाराम कांबळे ः 907 
  • अंकुश पाटील अपक्ष ः 478 
  • रामेश्वर सूर्यवंशी ः 249 
  • अनवर खॉं पठाण ः 438 
  • शेषराव कांबळे ः 345 
  • श्रीमंत ऊसनाळे ः 641 
  • राजकुमार सस्तापुरे ः 644 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election nilanga final result Sambhaji patil Nilangekar won