मराठवाडा : 'या' मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार | Election Results

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

पैठण विधानसभा मतदार संघात एकतर्फी लढत सुरु

औरंगाबादः पैठण विधानसभा मतदार संघातून आठव्या फेरीअखेर शिवसेनेचे संदीपान भूमरे यांनी 12 हजार 465 मतांची आघाडी घेतली आहे. पैठण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा मजबुत गड म्हणून ओळखला जातो. पैठण विधानसभा मतदार संघाच्या या लढतीच्या आठव्या फेरी अखेर शिवसेनेच्या संदीपान भूमरे यांना 29 हजार 568 मते तर राष्ट्रवादी काॅग्रेसचे दत्ता गोर्डे यांना 12 हजार 332 मते मिळाली आहेत. 

शिवसेनेचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांनी या मतदारसंघातून चारवेळा विजय मिळवला आहे. 95 ते 2004 अशी हॅट्रीक साधत भुमरे यांनी आपले नाणे खणखणीत असल्याचे सिध्द केले होते. 2009 मध्ये मात्र त्यांना राष्ट्रवादीकडून धक्कादायक पराभव पचवावा लागला होता. पण पुढच्याच निवडणुकीत त्यांनी युती नसतांना पैठण मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा भुमरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची दाट शक्‍यता आहे. विशेष म्हणजे त्यांना पक्षातंर्गत स्पर्धकच नसल्यामुळे भुमरे याचा मार्ग मोकळा असल्याचे बोलले जाते. 

पैठण विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सध्या तरी संदीपान भुमरे यांच्या शिवाय अन्य पर्याय पक्षापुढे नव्हता. त्यामुळे भुमरे यांना उमेदवारी मिळण्यात कुठलीच अडचण पक्षाला नव्हती. 
त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले होते. जालना लोकसभा मतदारसंघात पैठण विधानसभा येत असल्याने सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी डझनभर इच्छूक पक्षात तयार केले होते. शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले दत्ता गोर्डे यांच्यासह अनेकांना विधानसभेच्या उमेदवारीचे आश्‍वासन देत दानवे यांनी पक्षात घेतले होते. याचा फायदा दानवे यांना लोकसभा निवडणुकीत भरघोत मतदानाच्या रुपात झाला. 

 

पण त्यानंतर राज्यात पुन्हा युतीचे वारे वाहू लागेल आणि आता विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती निश्‍चित झाली. त्यामुळे उमेदवारीच्या आशेवर भाजपमध्ये गेलेल्या अनेकांचा स्वप्न भंग झाला. तालुक्‍यातील शरद सहकारी कारखाना ताब्यात घेत भुमरे यांनी सहकार क्षेत्रात देखील उडी घेतल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांचे गळीत हंगाम कार्यक्रमाच्या वेळी तोंडभरून कौतुक केले होते. 

 

एकंदरित विधानसभेची पाचव्यांदा उमेदवारी मिळवत भुमरे विक्रमाला गवसणी घालणार असे चित्र दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Paithan trends afternoon