वीज बिलासाठी शेतकरी वेठीस, रोहित्र बंदचे निर्देश | Electricity Bill | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity Bill
वीज बिलासाठी शेतकरी वेठीस, रोहित्र बंदचे निर्देश

वीज बिलासाठी शेतकरी वेठीस, रोहित्र बंदचे निर्देश

कळंब (जि.उस्मानाबाद) : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतीपिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचं अक्षरशः दिवाळ निघालं आहे. दिवाळी सुद्धा शेतकऱ्यांना गोड लागली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात असतानाच आता शेतकऱ्याच्या मानगुटीवर शेतीपंपाच्या वीज वसुलीची टांगती तलवार असून गुरुवारपासून (ता.१८) शेती पंपाच्या वीज वसुली करिता महावितरण कंपनीकडून रोहित्र बंद करण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याने शेतकरी हबकून गेले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले असतानाच शेतीपंपाचे वीजबिल भरण्यासाठी महावितरण कंपनीने (Mahavitaran Company) शेतकऱ्याना वेठीस धरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यात शेतीपंपाचे २९ हजार ग्राहक असून १६ कोटी रुपये थकल्याची माहिती समोर आली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतकरी (Farmer) कंगाल झालेल्या अवस्थेत आहेत.

हेही वाचा: 'नेताजी आणि गांधी हिरो होते,जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले'

सोयाबीन पिकाचे उत्पन्न घटले आहे. बाजारात केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन पिकाला बाजारात कवढीमोल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था अधिकच बिकट बनली आहे. शासनाने हेक्टरी आर्थिक मदत दिवाळीपूर्वी देण्याचे वचन दिले होते. गावाची नुकसानीची टक्केवारी कमी दाखविण्यात आल्याने आर्थिक मदत किती मिळाली रे..भाऊ असे म्हणण्याची वेळ आली आहे. संकटावर मात करत शेतकऱ्यानी रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी तयारी केली असून तालुक्यातील एकूण हेक्टर क्षेत्रापैकी ८० टक्के हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्याची नितांत गरज आहे. थकीत वीजबिलासाठी शेतीपंपाचे रोहित्र बंद करणे, वीजप्रवाह खंडित करणे आदी कठोर स्वरूपातील मोहीम गुरुवारपासून तालुक्यात राबविण्यात येणार आहे.

सक्त निर्देश,रोहित्र बंद करणार

तालुक्यात शेतीपंपाचे २९ हजार ग्राहक आहेत. जवळपास १६ कोटी रुपये एकट्या तालुक्यातील शेतकऱ्याकडे असून वारंवार आवाहन करूनही शेतकऱ्यांकडून वीज बिल भरण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महावितरण कंपनी अडचणीत आहे. महावितरणच्या वरिष्ठ कार्यलयाकडून वीजसाठी रोहित्र बंद करा असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी रोहित्रवरील शेतकऱ्यानी एकत्रित येऊन वीज बिल भरावे, असे आवाहन महावितरणचे प्रभारी वीज उपअभियंता श्री गायकवाड यांनी केले आहे.

loading image
go to top