महावितरण आता पूर्वसूचनाही देणार 

महावितरण आता पूर्वसूचनाही देणार 

औरंगाबाद  - ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण आता ग्राहकांना मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार याचीही पूर्वसूचना देणार आहे. ग्राहकांना महावितरणचा कर्मचारी रीडिंगसाठी केव्हा येत आहे, याची सूचना एक दिवस अगोदर "एसएमएस'ने मिळणार आहे. 

महावितरणने ऑगस्ट 2016 पासून मोबाईल ऍपद्वारे मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात काही प्रमाणात अचूकता आली आहे. आता वीज मीटर रीडिंग प्रक्रियेत ग्राहकांना आपले मीटर रीडिंग तत्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईलवर ग्राहकांना मीटर रीडिंगच्या पूर्वसूचनेचा एसएमएस देण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी 8 ते 10, सकाळी 10 ते दुपारी 12, दुपारी 12 ते 3 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 यादरम्यान कोणत्या वेळेत रीडिंग घेतले जाणार आहे, याची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार असून, रीडिंग घेण्याच्या वेळेस ग्राहकांना उपस्थित राहता येणार आहे. महावितरणकडून ग्राहकांसाठी राबविण्यात येत असलेल्या इतरही विविध उपयुक्त उपक्रमांची माहिती ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर दिली जाते. 

अशी करा मोबाईल नोंदणी 
महावितरणच्या ज्या ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नाही, अशा ग्राहकांनी महावितरणच्या क्र. 9225592255 या क्रमांकावर "एसएमएस'द्वारे स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. आपल्या नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून "एसएमएस' केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय चोवीस तास सुरू असलेल्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत; तसेच www.mahadiscom.in संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ऍपद्वारेही मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. 

प्रयोगित तत्त्वावर योजना सुरू 
महावितरणने 1 मार्चपासून राज्यातील गणेशखिंड, रास्तापेठ, कल्याण, नागपूर शहर मंडळ, वाशी व ठाणे (मुंब्राव्यतिरिक्त) अशा सहा मंडळांत ग्राहकांना मीटर रीडिंगची पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com