महावितरणचा कारभार चालतो चारच कर्मचाऱ्यांवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

सिद्धनाथ वाडगाव (ता. गंगापूर) येथील महावितरण कंपनीच्या 33 केव्ही वीज उपकेंद्र कार्यालयात 14 पदे मंजूर आहे, तर 9 पदे रिक्‍त आहेत; तसेच प्रभारी कनिष्ठ अभियंत्यांच्या भरवशावरच कार्यभार असल्याने शेतकऱ्यांची विविध कामे प्रलंबित असून वारंवार विद्युत प्रवाहामध्ये तांत्रिक बिघाड होत आहे.

सिद्धनाथ वाडगाव (जि.औरंगाबाद ) ः सिद्धनाथ वाडगाव (ता. गंगापूर) येथील महावितरण कंपनीच्या 33 केव्ही वीज उपकेंद्र कार्यालयात 14 पदे मंजूर आहे, तर 9 पदे रिक्‍त आहेत; तसेच प्रभारी कनिष्ठ अभियंत्यांच्या भरवशावरच कार्यभार असल्याने शेतकऱ्यांची विविध कामे प्रलंबित असून वारंवार विद्युत प्रवाहामध्ये तांत्रिक बिघाड होत आहे.

त्याचा मोठा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. तत्काळ कर्मचारी व कायमस्वरूपी अभियंत्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सिद्धनाथ वाडगावअंतर्गत येणाऱ्या तेवीस गावांमधील तीन हजारांहून अधिक वीज ग्राहक आणि कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात असूनही काही लाइनमन सेवानिवृत्त झाले, तर काहींना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर पसरलेल्या वीज वाहिन्यांची देखभाल करण्याची जबाबदारी अवघ्या चारच कर्मचाऱ्यांवर येऊन ठेपल्याने अनेक गावांत शेतकऱ्यांची विविध कामे अपूर्ण आहेत. रिक्त पदे तत्काळ भरली नाहीत, तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत.

या कार्यालयास वरिष्ठांचा वरदहस्त असल्याने सहायक अभियंता हे मुख्य पद असून तेही गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहे. प्रभारी कारभारी नेमून गाडा हाकला जात आहे, हे विशेष. येथे महावितरण कंपनीचे 33 केव्ही क्षमतेचे युनिट आहे. त्याअंतर्गत असणाऱ्या 23 गावांतील तीन हजारांहून अधिक विद्युत ग्राहकांना सेवा देण्यासाठी सहायक अभियंता यांच्या देखरेखीखाली 13 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. दीड वर्षापूर्वी सहायक अभियंता जोशी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी सहायक अभियंतापदी कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने सिद्धनाथ वाडगाव येथील महावितरण कार्यालयातील अपूर्ण कर्मचारी व कनिष्ठ अभियंत्यांची त्वरित नियुक्ती करून मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी ग्राहकांच्या वतीने करण्यात येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavitran Works With Four Staff